(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील जि. प. प्रा. शाळा जंगलवाडी येथे शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गौरी-गणपती सणाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
शासनाने नव्याने काढलेल्या परिपत्रकानुसार शाळेत यापूर्वीच माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात आला आहे. या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष यशवंत घागरे यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा झाला. यावेळी घागरेवाडी, गार्डीवाडी तसेच धनावडेवाडीतील अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते.
ज्या शाळेत आपल्या शिक्षणाची सुरुवात झाली, त्या शाळेतील गुरुजी, शाळेतील सुंदर आठवणी, बालपणातील प्रसंग आणि त्यावेळचे मित्र यांचा अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून आवर्जून उल्लेख केला. या आठवणींना उजाळा देताना जुन्या सहकाऱ्यांसोबतच्या आठवणींना अनेकांनी उजाळा दिला.
जंगलवाडी शाळेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, समाजसेवक, शिक्षक तसेच शासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. यातील काही जण सेवानिवृत्त झाले आहेत. या शाळेत शिक्षण घेतल्यानंतर आपण शिक्षक, इंजिनिअर आणि उद्योजक झाल्याचेही अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
जुन्या गुरुजींच्या आठवणींना उजाळा देताना त्या काळातील प्राथमिक शिक्षक हेर्लेकर आणि वामनराव सरदेसाई गुरुजी यांच्या प्रेमळ आठवणी प्रा. रवींद्र आठल्ये आणि बन्सीधर आठल्ये यांनी सांगितल्या.
सुरेंद्र गार्डी यांनी शाळेच्या प्रगतीसाठी सदैव सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच विद्यार्थ्यांना पंचवीस गोष्टींची पुस्तके भेट दिली. अनिल रातांबे यांनी शालेय शिक्षणात होत असलेल्या बदलांचा उल्लेख करत त्यानुसार पालकांची जबाबदारी काय असावी, याची आठवण करून दिली.
अध्यक्षीय भाषणात यशवंत घागरे यांनी माजी विद्यार्थी मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. शाळेसाठी अनेकांनी दिलेल्या योगदानाचा त्यांनी उल्लेख केला. शाळेचे सुंदर शैक्षणिक आणि भौगोलिक वातावरण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर सकारात्मक परिणाम करत असल्याचे सांगतानाच घटत्या विद्यार्थी पटाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचेही योगदान अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.
शाळेच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांकडून नेहमीच सहकार्य मिळते, असे मुख्याध्यापक सिताराम करंबेळे यांनी सांगितले. शाळेला सुट्टी असतानाही गणपती सणासाठी माजी विद्यार्थी गावात येणार असल्याचे लक्षात घेऊन त्यांनी मेळाव्याची सर्व तयारी केली होती. ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे हा मेळावा यशस्वी झाल्याचे त्यांनी समारोपावेळी नमूद केले.
यावेळी सुरेश गार्डी, चंद्रकांत गार्डी, सुरेश घागरे, निलेश गार्डी, योगेश गार्डी, दिलीप गार्डी, भाऊ गार्डी, तुषार घागरे, सुरेश हतपले, प्रवीण जोयशी, संतोष रातांबे, संतोष साबळे, मनोहर दळवी, रुपेश कांबळे, धनावडे तसेच अनेक माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. अनेक माजी विद्यार्थी व उपस्थितांनी शाळेच्या गरजा लक्षात घेऊन वस्तुरूप तसेच रोख स्वरूपात देणगी दिली. त्यामुळे माजी विद्यार्थ्यांच्या आठवणी आणि शाळेसाठीच्या योगदानाची सांगड घालणारा हा मेळावा उत्साहात संपन्न झाला.


