(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहराजवळील नाचणे रोड परिसरातील सुपलवाडी फाट्याजवळ पाण्याची मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. या भागात पाण्याची समस्या उद्भवत असते. पाण्याचा तुटवडा असलेल्या भागात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
फुटलेल्या जलवाहिनीमधून उंचावर उसळणारा पाण्याचा फवारा पाहून परिसरात जणू कारंजेच उडत असल्याचा अनुभव नागरिकांसह वाहनचालकांना येत आहे. मात्र, ही जलवाहिनी दुरुस्त करण्याऐवजी फुटलेल्या ठिकाणी फक्त मोठे दगड ठेवून पाण्याचा फवारा रोखण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, पाण्याच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय कसा सहन करायचा, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. जलवाहिनी दुरुस्तीची तातडीची कामे करण्यात यावी, तसेच पाणीपुरवठा व्यवस्थापनात कायमस्वरूपी सुधारणा करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

