(रत्नागिरी)
भारताच्या आगामी डिजिटल जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी पूर्ण केली असून प्रत्यक्ष अंमलबजावणीला वेग आला आहे. जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेचा विचार करून एकूण 2731 घरयादी गट (एचएलओ ब्लॉक्स) निश्चित करण्यात आले आहेत. या मोहिमेसाठी 3123 कर्मचाऱ्यांची फळी तैनात करण्यात आली असून त्यामध्ये 2621 प्रगणक, 460 पर्यवेक्षक आणि 42 क्षेत्रीय प्रशिक्षकांचा समावेश आहे.
प्रशासकीय सुलभतेसाठी तालुकास्तरावर स्वतंत्र यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. ग्रामीण भागात तहसीलदार ‘चार्ज ऑफिसर’ म्हणून काम पाहणार असून, शहरी भागातील नगर परिषद व नगरपंचायत क्षेत्रांसाठी संबंधित मुख्याधिकारी यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संपूर्ण जनगणना प्रक्रिया डिजिटल माध्यमातून पार पडणार असल्याने सर्व कर्मचाऱ्यांना मोबाईल अॅपच्या साहाय्याने माहिती नोंदवण्याचे सखोल प्रशिक्षण दिले जात आहे.
नागरिकांच्या सक्रिय सहभागासाठी 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत ‘सेल्फ इन्युमरेशन’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी secensus.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वतःची व कुटुंबाची माहिती ऑनलाइन भरता येणार आहे. पोर्टलवरील एकूण 34 प्रश्नांची अचूक माहिती भरल्यानंतर ‘एसई आयडी’ प्राप्त होईल. हा आयडी जतन करून ठेवणे आवश्यक असून, पुढील टप्प्यात घरी भेट देणाऱ्या प्रगणकांना तो दाखवावा लागणार आहे.
दरम्यान, घरयादी व गृहनिर्माण जनगणनेचा (एचएलओ) पहिला टप्पा 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत पार पडणार आहे. जनगणना ही राष्ट्राच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्याने नागरिकांनी अधिकृत पोर्टलचा वापर करून माहिती भरावी किंवा प्रगणकांना वस्तुनिष्ठ माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.

