(रत्नागिरी)
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील एका दोन वर्षीय बालकाला ऐकण्याची आणि भविष्यात बोलण्याची आशा मिळाली आहे. शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेमुळे अत्यंत खर्चिक असलेली कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया मुंबई येथे पूर्णपणे मोफत करण्यात आली.
रत्नागिरी तालुक्यातील कुरतडे कोंड खंडकर येथील रहिवासी कु. अनिश राजेंद्र आग्रे (वय २ वर्षे) याला जन्मतःच ऐकू येत नसल्याने त्याच्या बोलण्याच्या विकासावरही परिणाम झाला होता. अंगणवाडीतील नियमित आरोग्य तपासणीदरम्यान आरबीएसकेच्या वैद्यकीय पथकाने ही समस्या ओळखून त्वरित पुढील उपचारांसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू केली.
यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या संदर्भ सेवा प्रणालीद्वारे सर्व आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण करण्यात आल्या. त्यानंतर २ जुलै २०२६ रोजी मुंबई येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये अनिशवर अत्याधुनिक कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
ही शस्त्रक्रिया शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आली. या यशस्वी उपचारामुळे अनिशला ऐकण्याची क्षमता विकसित होण्यास मदत होणार असून, पुढील पुनर्वसन आणि स्पीच थेरपीच्या सहाय्याने त्याच्या बोलण्याच्या विकासालाही चालना मिळणार आहे.
शासनाच्या या कल्याणकारी योजनेमुळे आपल्या मुलाला नवे आयुष्य मिळाल्याची भावना व्यक्त करत आग्रे कुटुंबीयांनी आरबीएसकेच्या वैद्यकीय पथक, जिल्हा रुग्णालय प्रशासन आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे मनःपूर्वक आभार मानले.
आरबीएसकेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बालकांना वेळेवर निदान, तज्ज्ञ उपचार आणि मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध होत असल्याचे हे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

