(दापोली/ रत्नागिरी)
ऑनलाइन सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वीकारण्यासाठी स्वतःच्या बँक खात्याचा वापर करण्यास परवानगी दिल्याचा प्रकार दापोली पोलिसांच्या तपासातून समोर आला आहे. या प्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेदारासह एका अनोळखी व्यक्तीविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्रीपासून आतापर्यंत संबंधित स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात सायबर फसवणुकीशी संबंधित रक्कम जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. देशातील एका ऑनलाइन सायबर फसवणूक प्रकरणातील रक्कम स्वीकारण्यासाठी संबंधित खात्याचा वापर करण्यात आला असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. तसेच, खात्यात जमा झालेली रक्कम पुढील खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यासाठी खातेदाराने आपल्या साथीदारांना परवानगी दिल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यामुळे सायबर फसवणुकीतील पैशांचा प्रवाह तपासण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्याचे पोलीस शिपाई संतोष गणपत चव्हाण (ब.नं. ६८५) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाचा संबंधित खातेदार, ज्याचे पूर्ण नाव व गाव सध्या समोर आलेले नाही, तसेच एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४८/२०२६ नोंद करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील संबंधित कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलिसांकडून सुरू आहे. सायबर फसवणुकीच्या व्यवहारांसाठी स्वतःचे बँक खाते इतरांना उपलब्ध करून देणे किंवा संशयास्पद आर्थिक व्यवहारांना परवानगी देणे कायदेशीर अडचणी निर्माण करू शकते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या बँक खात्याचा वापर कोणाकडून आणि कोणत्या कारणासाठी केला जात आहे, याबाबत विशेष खबरदारी घेण्याची आता गरज आहे.


