( चिपळूण / वार्ताहर )
दापोली तालुक्यातील आडी-चिखलगाव परिसरातील डोंगररांगांच्या कुशीत लपलेल्या अपरिचित ‘कोंडी’ धबधब्याची निसर्गसफर चिपळूणमधील निसर्गप्रेमींनी नुकतीच अनुभवली. चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या नदीपात्रात कोसळणाऱ्या या धबधब्याचे निसर्गरम्य रूप पाहून सहभागी भारावून गेले. ‘आम्ही आबासाहेबांचे निसर्गप्रेमी’ समूहाच्या वतीने या भटकंतीचे आयोजन करण्यात आले होते.
पावसाळ्यामुळे संपूर्ण चिखलगाव परिसर हिरवाईने नटला होता. डोंगरांच्या उतारावरून झिरपणाऱ्या पाण्याच्या धारा, घनदाट झाडी, वळणावळणाच्या पायवाटा आणि सतत बरसणाऱ्या पावसाच्या सरी अशा निसर्गरम्य वातावरणातून निसर्गप्रेमींनी धबधब्याकडे वाटचाल केली. नदीपात्राकडे उतरताना कानावर पडणारा धबधब्याचा आवाज उत्सुकता वाढवत होता.
घनदाट जंगलातून मार्गक्रमण करत धबधब्याजवळ पोहोचताच उंचावरून शुभ्र फेसाळत कोसळणाऱ्या जलधारेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दगडांवरून वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट, अंगावर उडणारे तुषार आणि सभोवतालची नीरव शांतता यामुळे हा अनुभव अविस्मरणीय ठरला. मानवी वर्दळीपासून दूर असलेल्या या निसर्गस्थळी काही काळ रोजच्या धावपळीपासून मुक्त होत निसर्गाशी एकरूप होण्याचा आनंद सहभागीांनी घेतला.
या सफरीदरम्यान स्थानिक मार्गदर्शक अविनाश देपोलकर यांनी कृषी पर्यटनाच्या माध्यमातून भोजनासह अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच ‘कोंडी’ धबधबा आणि परिसराची माहितीही त्यांनी दिली. उपक्रमाचे नियोजन ‘आम्ही आबासाहेबांचे निसर्गप्रेमी’ समूहाचे प्रमुख विलास महाडिक यांनी केले. पर्यटन अभ्यासक समीर कोवळे यांनी मार्गदर्शक म्हणून सहभाग घेतला. रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीने दापोली तालुका अत्यंत समृद्ध असल्याचे कोवळे यांनी यावेळी नमूद केले.
‘कोंडी’ धबधब्याच्या स्वच्छतेचे आवाहन
निसर्गसौंदर्याचा आनंद घेत असतानाच धबधब्याच्या नदीपात्रात आढळलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि इतर कचऱ्यामुळे साहित्यिक तथा पर्यटन-पर्यावरण अभ्यासक धीरज वाटेकर यांनी नाराजी व्यक्त केली. अद्याप पर्यटकांच्या मोठ्या वर्दळीपासून दूर असलेल्या या परिसरातही नदीपात्रात कचरा आढळणे ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यटकांनी सोबत आणलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे वेष्टन आणि अन्य कचरा परिसरात न टाकता एका पिशवीत जमा करून परत घेऊन जाणे गरजेचे आहे. आगामी काळात या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता धबधब्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर कचराकुंड्या उभारण्याची आवश्यकता आहे. मात्र, नदीपात्राजवळ कचराकुंड्या ठेवू नयेत, कारण वारा किंवा प्राण्यांमुळे कचरा नदीत जाण्याची शक्यता आहे.
परिसरात कचरा टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई तसेच दंडात्मक उपाययोजना करण्याबाबत स्थानिक प्रशासनाने नियोजन करावे. यासाठी योग्य ठिकाणी माहितीफलक लावणेही उपयुक्त ठरेल. स्थानिक नागरिक हेच या निसर्गस्थळाचे खरे रक्षक असून त्यांनी पुढाकार घेऊन ‘पर्यटन समिती’ स्थापन करून परिसराच्या संवर्धनासाठी काम करण्याची गरज असल्याचे वाटेकर यांनी सांगितले.
चिखलगावसह परिसरातील पर्यटनस्थळांना भेट
‘कोंडी’ धबधब्याच्या भेटीनंतर निसर्गप्रेमींनी चिखलगाव येथील लोकमान्य टिळक मंदिर वास्तू, गाव पाहणी, कोळथरे येथील आगोम आयुर्वेद तसेच कोळथरे समुद्रकिनाऱ्यालाही भेट दिली. माधव महाजन यांनी उभारलेल्या वाईन कारखान्याला भेट देऊन सहभागीांनी त्यांच्याकडून या उपक्रमाची माहिती जाणून घेतली.
या निसर्गसफरीत सीमा कदम, स्मिता वीरकर, वृषाली गोगटे, विद्या पाटणकर, श्रद्धा विचारे, मंगला दळी, वृषाली सुर्वे, जान्हवी बापट आदी निसर्गप्रेमी सहभागी झाले होते. ‘कोंडी’ धबधब्याचे निसर्गसौंदर्य अनुभवतानाच त्याचे पर्यावरणीय महत्त्व आणि स्वच्छता राखण्याची जबाबदारी याची जाणीव या सफरीतून सहभागीांना झाली.

