(रत्नागिरी /प्रतिनिधी)
गणपतीची पूजा आटोपल्यानंतर ‘निवळी येथे जाऊन येतो’ असे सांगून घराबाहेर पडलेला २७ वर्षीय तरुण पुन्हा घरी परतलाच नसल्याने खळबळ उडाली आहे. नातेवाईक, मित्रमैत्रिणी तसेच सासरवाडी परिसरात शोध घेऊनही तरुणाचा ठावठिकाणा लागला नसल्याने त्याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रफुल्ल प्रकाश तांबे (वय २७, रा. करबुडे, मुळगाव, ता. जि. रत्नागिरी) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील प्रकाश गोपाळ तांबे (वय ६०) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रफुल्ल याने गणपतीची पूजा केली. त्यानंतर सुमारे ११.४५ वाजता ‘मी निवळी येथे जाऊन येतो,’ असे सांगून तो घरातून बाहेर पडला. मात्र त्यानंतर तो घरी परतला नाही. प्रफुल्ल बराच वेळ घरी न आल्याने कुटुंबीयांनी सुरुवातीला त्याचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. त्यानंतर नातेवाईक, मित्रमैत्रिणी तसेच सासरवाडीच्या ठिकाणीही चौकशी करण्यात आली. मात्र सर्वत्र शोध घेऊनही प्रफुल्लचा ठावठिकाणा लागला नाही.
दरम्यान, प्रफुल्ल स्वतःहून बेपत्ता झाला की त्याच्यासोबत काही अनुचित प्रकार घडला, याबाबत कुटुंबीयांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. अखेर त्याचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण करून नेले असावे, असा संशय व्यक्त करत प्रकाश तांबे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १४०(३) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रफुल्ल तांबे यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.


