(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
जमिनीवरील विविध आव्हानात्मक मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे भारतीय लष्कराचे श्वान सैनिक आता हवाई मोहिमांसाठीही सज्ज झाले आहेत. मध्य भारतातील बेहाट ड्रॉप झोनमध्ये एका पॅराटूपरने डॉग हँडलर आणि त्याच्या श्वानासह संपूर्ण युद्ध साहित्यासह विमानातून यशस्वी टँडम पॅराशूट जंप पूर्ण केली. भारतीय सैन्याच्या इतिहासात डॉग हँडलर आणि श्वानाने एकत्रितपणे केलेली ही पहिलीच अशा प्रकारची यशस्वी उडी मानली जात आहे. लष्कराच्या सेंट्रल कमांडने या कामगिरीचे कौतुक करताना जवान आणि श्वानातील अतूट नाते, परस्पर विश्वास तसेच लष्करी सज्जतेचा हा अनोखा पुरावा असल्याचे नमूद केले.
रणांगणातील प्रत्यक्ष परिस्थितीशी या श्वानांना जुळवून घेण्यासाठी त्यांना अत्यंत कठोर बॅटल इनॉक्युलेशन प्रशिक्षण दिले जाते. बॉम्बस्फोटांचे कानठळ्या बसवणारे आवाज, गोळीबार, धूर आणि रणांगणातील गोंधळ अशा परिस्थितीतही शांत राहून काम करण्याचे प्रशिक्षण त्यांना दिले जाते. अशा प्रकारे प्रशिक्षित श्वानांचा वापर आंतरराष्ट्रीय स्तरावरही केला जातो. अमेरिकेच्या नेव्ही सील्सने ओसामा बिन लादेनविरोधात राबवलेल्या गुप्त मोहिमेतही अशाच एका श्वानाचा समावेश होता.
दहशतवादविरोधी कारवाया आणि सीमा सुरक्षेपासून स्फोटके व भूसुरुंग शोधण्यापर्यंत विविध मोहिमांमध्ये हे श्वान लष्करासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. व्हीआयपी सुरक्षा तसेच नैसर्गिक आपत्तींमध्ये बचाव कार्यातही त्यांचा उपयोग केला जातो. आकाराने लहान आणि चपळ असल्यामुळे ते शत्रूचे लक्ष्य सहजपणे बनत नाहीत. मानवाला पोहोचणे अशक्य असलेल्या अरुंद ठिकाणीही ते जाऊ शकतात आणि कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सैन्याला थेट माहिती पुरवतात. कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करणाऱ्या श्वानांना पूर्ण लष्करी सन्मानाने अंतिम निरोप दिला जातो. काही श्वानांना शौर्य पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे.
मोहिमेदरम्यान श्वानांना अतिविषम हवामान आणि मोठ्या शारीरिक ताणाला सामोरे जावे लागते. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भारतीय लष्कर हलक्या वजनाची ‘मॉड्यूलर बुलेटप्रूफ जॅकेट्स’ तसेच स्मार्ट कॉलर विकसित करत आहे. नियंत्रण रेषेवर किंवा दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान बुलेटप्रूफ जॅकेटमुळे गोळ्या आणि छऱ्यांपासून श्वानांचे संरक्षण होण्यास मदत होईल. दुसरीकडे, स्मार्ट कॉलरच्या माध्यमातून श्वानाच्या शरीराचे तापमान, नाडीचे ठोके, श्वसनक्रिया आणि थकवा यावर २४ तास लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.


