(दापोली)
“प्लास्टिक मुक्त दापोली” या ध्येयाला साकार रूप देत जेसीआय दापोली आयोजित “जेसीआय चषक 2026” हा क्रिकेट स्पर्धेचा भव्य सोहळा उत्साह, एकजूट आणि सामाजिक जाणीवेचा सुंदर संगम ठरला.
तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेचे उद्घाटन दापोलीच्या नगराध्यक्षा कृपाताई घाग, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा साधनाताई बोत्रे, पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते आणि जेसीआय दापोलीचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता यांच्या हस्ते झाले. यावेळी बहुजन हिताय विद्यामंदिर, आगरवायंगणी आणि रामराजे स्कूल अँड कॉलेज, दापोली यांना सॅनिटरी डिस्पोजेबल मशीन देऊन सामाजिक बांधिलकी अधोरेखित करण्यात आली.
या स्पर्धेत 19 संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात इमाद पॅकर्स संघाने विजेतेपद पटकावले, तर सनी कोंड, दापोली संघ उपविजेता ठरला.
स्पर्धेतील वैयक्तिक कामगिरीत ओसामा (इमाद पॅकर्स) याने मालिकावीर आणि सर्वोत्तम फलंदाज हे दुहेरी मान पटकावले. सर्वोत्तम गोलंदाज म्हणून अमित (सनी कोंड) तर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून जतिन साळगावकर (दापोली 11) यांचा गौरव करण्यात आला.
बक्षीस वितरण समारंभाला नगराध्यक्षा कृपाताई घाग, साधनाताई बोत्रे, डॉ. जयवंत जालगांवकर, राजू घोसाळकर, राहुलशेठ राठोड, मिलिंद शेठ तसेच जेसीआय दापोलीचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता, जेसी अतुल गोंदकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
“प्लास्टिक मुक्त दापोली”, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी स्पर्धेदरम्यान विविध उपक्रम राबविण्यात आले. कागदी व कापडी पिशव्यांचे वितरण, एसटी चालक-वाहक व रिक्षाचालकांना स्टील बाटल्यांचे वाटप, बीच स्वच्छता मोहीम आणि जनजागृती कार्यक्रम यामुळे या उपक्रमाला सामाजिक चळवळीचे रूप प्राप्त झाले.
या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी जेसीआय दापोलीचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता, बासीत देशमुख, तेजस मेहता, रोशन वेदक, सीए रुषी शेठ, अद्नान मुकादम, रुषी तलाठी, भूषण इसवलकर, कुणाल मंडलिक, स्वप्नील मेहता, अनिकेत खानविलकर, फराझ रखांगे आणि सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
खेळ, समाज आणि पर्यावरण यांचा समतोल साधणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

