( दापोली )
दापोली पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध विक्रीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल २४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोली शहरातील आंबा पॉईंट परिसरात असलेल्या काळ्या वडापाव दुकानासमोर प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला.
या कारवाईत कृष्णा नारायण गवळी (वय ६०, रा. दापोली) याच्या ताब्यातून केसरीयुक्त विमल पान मसाल्याची १,२१० पाकिटे आणि सुगंधित तंबाखूची १,२१० पाकिटे, असा एकूण २,४२० पाकिटांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत २४ हजार २०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम अंतर्गत दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.

