(दापोली)
तालुक्यातील मुरुड समुद्रामध्ये डॉल्फिन पाहायला जाणाऱ्या पर्यटकांची बोट उलटली. चालकासह सर्व 11 प्रवाशांनी लाईफजॅकेट घातलेले असल्याने वाचविण्यात यश आले. परंतु, एका पर्यटकाची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी (दि.16) दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली.
मुरुड समुद्रकिनारी अनधिकृतरीत्या वॉटर स्पोर्टस् व्यवसाय करणारी एक नौका क्षमतेपेक्षा जास्त लोकांना घेऊन जात असताना अचानक उलटली. स्थानिकांनी बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवले. नौकेत एकूण 9 प्रवासी, 1चालक व 1सहकारी असे 11 जण होते. अधिक प्रवासी घेतल्याने हा प्रकार घडला असल्याची चर्चा या परिसरात होत आहे. रविवारी वातावरण फारसे चांगले नव्हते. जोराचा वारा वाहत होता. भरती असूनही पाण्याला करंट येत होता. साधारण तीनेक फूट पाण्यात गेल्यावर मोठ्या लाटेचा हिसका आणि पाण्याला करंट असल्याने ही फायबरची बोट जागेवर बुडाली. सर्व प्रवाशांनी लाईफजॅकेट घातलेले होते तरीही बोट पलटी होताक्षणी सगळे प्रवासी पाण्यात पडले व बोटीतच अडकले. समोर किनाऱ्यावर गावकरी आणि इतर स्पोर्टस् गेमची माणसे असल्याने त्यांनी ताबडतोब जागेवर आपापल्या बोटी नेऊन माणसांना आपल्या बोटीत घेऊन सुरक्षित किनाऱ्यावर आणले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून, त्याला मुंबई येथे हलविण्यात आले आहे, तर अन्य एका पर्यटकालाही दुखापत झाली आहे. हे पर्यटक रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील असल्याचे समजते.
दापोलीमध्ये या प्रख्यात बीचवर अनधिकृत वॉटर स्पोर्टस् सुरू असून प्रशासनाकडून त्याकडे डोळेझाक केली जात असून, एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल स्थानिक ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे. अनधिकृत बोटिंग करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशा मागणीला स्थानिकांकडून जोर धरत आहे.