(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पहाटेच्या सुमारास भरधाव ट्रेलरवरील चालकाचे नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला. सवतसडा धबधब्याजवळील वळणावर ट्रेलर रस्त्याबाहेर जाऊन पलटी झाल्याने चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशन रतन सिंग (वय २९, रा. गोहाना, अजमेर, राजस्थान) असे मृत चालकाचे नाव आहे.
हा ट्रेलर चित्रकूट, उत्तर प्रदेश येथून जयगड, रत्नागिरीच्या दिशेने मुंबई-गोवा महामार्गावरून जात होता. मिळालेल्या माहितीनुसार, १६ सप्टेंबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास परशुराम घाटातील सावितसडा धबधब्याजवळील वळणावर हा अपघात झाला. संबंधित रस्ता घाटाचा, वळणावळणाचा आणि उताराचा असल्याची माहिती असूनही चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून ट्रेलर हयगयीने व भरधाव वेगाने चालविल्याचा आरोप आहे. या दरम्यान चालकाचे ट्रेलरवरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या बाहेर जाऊन पलटी झाले. या अपघातात किशन सिंग यांना गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी इस्लामउद्दीन समशद्दीन देशवाली (वय ५२, व्यवसाय गॅरेज, रा. रामसर, नसीराबाद, अजमेर, राजस्थान) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९४/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटातील तीव्र वळणे, उतार आणि पहाटेची वेळ लक्षात घेता वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सुरक्षित वाहनचालना करण्याची गरज या अपघातामुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे. घटनेचा पुढील तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.


