(चिपळूण /रत्नागिरी)
तालुक्यातील खांडोत्री गावात ओबीसी समाजाच्या स्वतंत्र नोंदीच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी जनगणना प्रक्रियेलाच ठाम विरोध दर्शवित प्रशासनासमोर तीव्र भूमिका घेतली. “जोपर्यंत जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना दिला जात नाही, तोपर्यंत कोणतीही माहिती देणार नाही,” असा निर्धार व्यक्त करत ग्रामस्थांनी गावात आलेल्या प्रगणक, पर्यवेक्षक आणि मंडळ अधिकाऱ्यांना माघारी परत पाठवले.
ओबीसी समाजाची स्वतंत्र ओळख आणि अचूक लोकसंख्या नोंद शासनाच्या नोंदीत होणे अत्यावश्यक असल्याची भूमिका ग्रामस्थांनी यावेळी स्पष्ट केली. जनगणना प्रक्रियेत ओबीसी घटकासाठी स्वतंत्र रकाना नसल्यास समाजावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत शासनाने याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली. या आंदोलनाला गावपातळीवर मोठा प्रतिसाद मिळाला. सरपंच सौ. सोनम घाणेकर, उपसरपंच अमोल अनंत कोदारे, माजी सरपंच सखाराम सुवरे तसेच कुणबी विकास मंडळ वहाळ-मुंबईचे अध्यक्ष अनंत कोदारे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले होते.
यावेळी दशरथ मेस्त्री, विष्णू कारेकर, शंकर जड्यार, सोमा सुवरे, सुनिल बाईत, जयराम सुवरे, संदीप सुवरे, मारुती कोदारे, महादेव घाणेकर, सुरेश सुर्वे, आत्माराम कातकर, शेखर गांधी, सुभाष घाणेकर, रामचंद्र सुवरे, सुरेश खांबे, दत्ताराम मेस्त्री, दौलत सुवरे, नंदकुमार सुवरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. खांडोत्री गावातील या भूमिकेमुळे ओबीसी जनगणनेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, ग्रामीण भागात या विषयावर तीव्र भावना व्यक्त होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

