(खेड / वार्ताहर)
राज्याचे माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री अँड. आशिष शेलार यांचे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यानिमित्त खेड रेल्वे स्थानकावर पारंपरिक जाखडी नृत्याच्या सादरीकरणातून उत्स्फूर्त आणि जंगी स्वागत करण्यात आले. भाजप नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या पुढाकाराने आयोजित या स्वागत सोहळ्यात कोकणच्या समृद्ध लोककला, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडले.
कोकणच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक असलेल्या जाखडी नृत्यासह पारंपरिक वाद्यांच्या गजरात मंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी कोकणच्या लोकसंस्कृतीचा अभिमान व्यक्त केला.
अलीकडेच महायुती सरकारने जाखडी नृत्यासह पारंपरिक लोककलांचा राज्य शासनाच्या लोककला अनुदान योजनेत समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून अँड. आशिष शेलार यांचे लोककलेच्या माध्यमातून करण्यात आलेले स्वागत विशेष लक्षवेधी ठरले.
यावेळी भाजपा आमदार प्रमोद जठार, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सहीबोले, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, दापोली महिला तालुकाध्यक्षा जया साळवी, खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, शहराध्यक्ष भालचंद्र (नंदू) साळवी, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अँड. मिलिंद (दादू) नांदगांवकर, उपशहराध्यक्ष प्रणव मापुस्कर, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, तसेच ओवैस चौगुले, स्वराज गांधी, अनिकेत पवार, राधेश्याम वर्मा, प्रदीप भोसले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

