(चिपळूण / रत्नागिरी)
मिटींगदरम्यान मोबाईलमध्ये व्हॉईस रेकॉर्डिंग केल्याच्या संशयातून तरुणाला बेदम मारहाण करत त्याचे दोन मोबाईल हिसकावून घेतल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील वहाळ कुंभारवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
धिरज दिलीप कुंभार (वय २९, सध्या रा. वहाळ कुंभारवाडी, ता. चिपळूण; मूळ रा. वडाळा पूर्व, मुंबई) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १७ मे रोजी रात्री सुमारे ११ वाजता वहाळ येथील दिलीप मांडवकर यांच्या घरी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस फिर्यादी धिरज कुंभार उपस्थित होते. बैठकीदरम्यान त्यांनी ओपो कंपनीच्या मोबाईलमध्ये व्हॉईस रेकॉर्डिंग केल्याचा संशय आरोपींना आला. याच कारणावरून संतप्त झालेल्या आरोपी क्रमांक १ भगवान मांडवकर याने “मोबाईल तपासायचा आहे,” असे सांगत फिर्यादीकडील वीवो आणि ओपो कंपनीचे प्रत्येकी सुमारे १५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपींनी हे मोबाईल परत न करता फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच आरोपींनी फिर्यादीला त्यांचे मामेभाऊ दिनेश वहाळकर यांना तातडीने बैठकीला आणण्यास भाग पाडत, “त्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. “उद्या बैठकीला हजर राहा, नाहीतर गावात येऊ देणार नाही,” अशा स्वरूपाची धमकी फोनवरून आरोपी महेंद्र कुंभार यांनी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सावर्डे पोलिसांनी भगवान मांडवकर, अभिजित मांडवकर, प्रकाश शिरकर, संतोष भैरवकर आणि महेंद्र कुंभार (सर्व रा. वहाळ कुंभारवाडी, ता. चिपळूण) यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सावर्डे पोलीस करत आहेत.

