(संगमेश्वर /प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच असून, तळेकांटे-बावनदी उड्डाण पुलाजवळ भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तेजस विनायक मेस्त्री (वय २३, रा. वेळवंड सुतारवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातप्रकरणी कारचालकाविरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ वर तळेकांटे-बावनदी उड्डाण पुलाजवळ हा अपघात झाला. आरोपी नामदेव रघुनाथ रांबाडे (वय ४५) हे त्यांच्या ताब्यातील शेवरलेट एन्जॉय कार (क्र. एमएच ०२/डीडब्ल्यू ०१९४) घेऊन संगमेश्वरहून लांजाच्या दिशेने जात होते. दरम्यान, बावनदी पुलावरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या शाईन मोटारसायकल (क्र. एमएच ०८/एबी ७६१४) वर तेजस मेस्त्री प्रवास करीत होते. कारचालकाने रस्त्याची परिस्थिती व वाहतुकीचा अंदाज न घेता वाहन अतिवेगाने चालविल्याने कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याचा आरोप पोलिसांच्या फिर्यादीत करण्यात आला आहे. धडकेनंतर तेजस यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले.
याप्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश शांताराम कोलगे (ब.नं. ७०७) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार नामदेव रघुनाथ रांबाडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयित आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१, १०६(१), १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. अपघाताची पुढील चौकशी संगमेश्वर पोलिसांकडून सुरू आहे.


