(रत्नागिरी / वार्ताहर)
हरयाणा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्राचे प्रतिभावान जलतरणपटू गौरी मिळके आणि विशाल कुबल यांची बंगळुरू येथे होणाऱ्या प्रतिष्ठित ‘एशियन मास्टर्स जलतरण स्पर्धे’साठी निवड झाली आहे. देशातील अव्वल जलतरणपटूंमध्ये झालेल्या चुरशीच्या राष्ट्रीय स्पर्धेत दोघांनीही आपल्या-आपल्या प्रकारांत अव्वल फेरीत स्थान मिळवत आशियाई स्पर्धेतील निवडीवर शिक्कामोर्तब केले.
गौरी मिळके हिने राष्ट्रीय स्पर्धेत विविध आव्हानात्मक प्रकारांत दमदार कामगिरी करत तीन प्रमुख स्पर्धांमध्ये अव्वल सहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. ४०० मीटर इंडिव्हिज्युअल मेडले (IM) प्रकारात तिने चौथे, २०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये चौथे, तर २०० मीटर इंडिव्हिज्युअल मेडले (IM) मध्ये पाचवे स्थान पटकावले. या कामगिरीच्या आधारे पहिल्या सहा खेळाडूंची निवड करण्यात आली.
विशाल कुबल यानेही स्टॅमिना आणि कौशल्याची कसोटी पाहणाऱ्या खडतर ४०० मीटर इंडिव्हिज्युअल मेडले (IM) प्रकारात चौथे स्थान मिळवत राष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवली.
गौरी मिळके आणि विशाल कुबल या दोन्ही जलतरणपटूंना अनुभवी प्रशिक्षक श्री. महेश मिलके सर यांचे सखोल मार्गदर्शन आणि शास्त्रोक्त प्रशिक्षण लाभले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कठोर सरावाच्या जोरावर या दोन्ही खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवत आता आशियाई पातळीवर मजल मारली आहे.
बंगळुरू येथे रंगणाऱ्या एशियन मास्टर्स जलतरण स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गौरी मिळके आणि विशाल कुबल सज्ज झाले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रीडा क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे.


