(रत्नागिरी)
कोकणातील शेतकरी म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येतो तो भात उत्पादक किंवा आंबा काजू व नारळ बागायतदार. गेल्या काही वर्षांमध्ये येथील शेतकरी पारंपरिक शेतीच्या जोडीला शेतीपूरक व्यवसाय करून चांगले अर्थार्जन करू लागले आहेत, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोळंबे (ता. जि. रत्नागिरी) गावचे शेतकरी श्री. साई प्रमोद कदम.
पूर्वी कोकणात शेळीपालन व्यवसाय फक्त येथील धनगर समाजापुरताच मर्यादित होता. येथील धनगर समाजातली माणसं माळरानावर शेळ्या चरवत आणि त्यातून प्राप्त होणाऱ्या अर्थावर उदरनिर्वाह करीत. आता हा व्यवसाय शेतकरी शेतीला जोड धंदा किंवा शेतीपूरक व्यवसाय म्हणून करून त्यांच्यासाठी शाश्वत उत्पन्नाचे साधन ठरला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे येथील श्री साई कदम यांच्या कुटुंबात त्यांचे आई-वडील व मोठी बहीण. त्यांचे वडील रिक्षा चालक होते व पारंपरिक पद्धतीने भात शेती करत. अल्प जमिनीतून पारंपरिक शेतीवर अवलंबून राहून घर चालवणं कठीण होत. त्यामुळे 2014 सालामध्ये दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या कोंकण कन्याळ जातीच्या केवळ दोन शेळींपासून शेळीपालन व्यवसायास सुरुवात केली.
पुढे 2014 मध्ये त्यांनी शेळीपालनावर आधारित विविध प्रशिक्षणे घेतली. त्यांनी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण शेळी पालन योजनेचा लाभ घेऊन शेळी खरेदीवर 50 % अनुदान मिळविले. त्यांनी उस्मानाबादी आणि सिरोही जातीच्या शेळ्या आणल्या आणि व्यवसाय वाढविला.
त्यांनी उंचवट्यावर पारंपरिक पद्धतीने मचाण बांधून शेळी पालनास सुरवात केली. नंतर त्यांच्या निदर्शनास आले की कोकणातल्या पावसाळी, जास्त आर्द्रतेच्या वातावरणास ह्या जाती तक धरू शकत नव्हत्या. पण कोकणातल्या स्थानिक जाती असल्या वातावरणास प्रतिकारक होत्या, पण त्यांची वजन वाढ कमी होती. म्हणून त्यांनी स्थानिक जातींचा बोअर, सिरोही, हैदराबादी, कोटा या सारख्या जातींचा संकर करून वाढीस चांगल्या व हवामानास प्रतिकारक शेळ्या उत्पन्न केल्या.
शेळ्यांच्या मांसाबरोबरच त्यांच्या लेंडीलाही शेती मध्ये फार महत्व आहे. त्यामध्ये सरासरी 1.3% नत्र, 0.5% स्फुरद, आणि 1.5 % पलाश आढळतं. त्यामुळे शेळीच्या लेंडीला भर खत म्हणून वापरासाठी भरपूर मागणी आहे. त्यांच्याकडे 15- 20 शेळ्यांचा कळप कायम राखला जातो. ईद सारख्या सणांना आजुबाजूच्या गावांमध्ये बकऱ्यांची विक्री होते. या व्यवसायातून त्यांना प्रतिवर्षी 2-2.5 लाखांचे उत्पन्न प्राप्त होते. या व्यवसायाने त्यांना आर्थिक उन्नती प्राप्त करून देऊन त्यांचे जीवनमान उंचाविले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: श्री साई प्रमोद कदम, 7499988052
“मृदासूत” गट, ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम, कृषि महाविद्यालय, दापोली.

