(रत्नागिरी / प्रतिनिधी)
“तुमचे सिमकार्ड बंद होणार आहे,” मंत्रालयाच्या नावाने आलेल्या एका बनावट फोन कॉलमुळे एका नागरिकाचे 61 लाखांचे आयुष्यभराचे जमवलेले पैसे उडाले. सायबर गुन्हेगारांनी ‘मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन’ व ‘नॅशनल सिक्युरिटी’चा बनाव करून हा प्रकार केला. मात्र, रत्नागिरी सायबर पोलिसांनी वेळेवर कारवाई करत आरोपीला गुजरातमधून अटक केली असून, त्याच्याकडून आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे.
फिर्यादीला ‘मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन’मधून बोलत असल्याचे भासवून सिमकार्ड बंद होणार असल्याची भीती दाखवली गेली. त्यानंतर त्यांच्यावर पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचा बहाणा करत दुसऱ्या एका व्यक्तीने स्वतःला पोलीस अधिकारी सांगितले. या बनावट अधिकाऱ्यांनी फिर्यादीच्या नावाने कॅनरा बँकेत खोटे खाते उघडले. त्यामधून २ कोटी रुपयांचा कथित मनी लॉन्ड्रिंगचा व्यवहार दाखवून फिर्यादीला धमकावून ६१,१९,०८० रुपये भरण्यास भाग पाडले.
फिर्यादीच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाणे, रत्नागिरी येथे गुन्हा रजि. नं. 05/2024, भारतीय न्याय सहिता 2023 चे कलम 318(4), 319(2), 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66(C), 66(D) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तांत्रिक विश्लेषण व बँकांच्या सहकार्याने तपास करताना मुख्य आरोपी नेपाल निताई चरण जना (रा. सुरत, मूळ प. बंगाल) याचे धागेदोरे मिळाले. पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि श्रीमती स्मिता सुतार यांच्या नेतृत्वाखाली पोहवा संदीप नाईक, अमोल गमरे, विक्रम पाटील व पोकॉ निलेश शेलार यांचे पथक गुजरात येथे रवाना करण्यात आले. त्यांनी आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, ३ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली.
सावधानतेचा इशारा
कोणताही व्यक्ती ‘मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन’, ‘नॅशनल सिक्युरिटी’ किंवा तत्सम विभागाचे भासवून कॉल करत असेल, तुमचे सिमकार्ड/बँक खाते अडणार असल्याचे सांगत असेल, तर सतर्क राहा. अशा कॉलवर विश्वास ठेवू नका. कोणतीही वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती शेअर करू नका.

