(रत्नागिरी)
कोल्हापूर-रत्नागिरीला जोडणाऱ्या आंबा घाटात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली आहे. दरडीखाली रस्ता गेल्याने या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ठेकेदार कंपनीकडून दरड हटवण्याचे प्रयत्न सुरू असून, रस्ता सुरळीत होण्यासाठी काही वेळ लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दोन्ही बाजूने पाच जेसीबी च्या सहाय्याने दरड बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. थोड्या वेळात एका बाजूची मार्गिका सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आंबा घाटातील माती व दगड सैल झाले होते. त्याचा परिणाम म्हणून आज सकाळी साखरपा–मुर्शी चेक पोस्टच्या पुढील एका धोकादायक वळणावर अचानक मोठ्या प्रमाणावर माती आणि दगड रस्त्यावर कोसळले. या दरडीमुळे रस्त्याचा मोठा भाग पूर्णपणे बंद झाला असून कोणत्याही वाहनांना पुढे जाणे अशक्य झाले आहे.
ही दरड कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. दरड हटवण्यासाठी जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे, मात्र डोंगराच्या माथ्यावरून अजूनही लहान दगड आणि माती खाली येत असल्याने कामात अडथळे येत आहेत.

