(राजापूर / तुषार पाचलकर)
तालुक्यातील बहुचर्चित काजिर्डा-जामदा धरण प्रकल्पाच्या पुनर्वसन प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे.
सुमारे ३० वर्षांपासून अपूर्णावस्थेत असलेल्या जामदा प्रकल्पाचा सिंचन घोटाळ्याशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच ग्रामस्थांकडून त्याला विरोध होत आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून धरणाचे पुनर्वसन तसेच बुडीत क्षेत्रातील घरांचे सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणाच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा संशय ग्रामस्थांकडूनही व्यक्त केला जात आहे.
सौंदळकर यांनी निवेदनात केलेल्या आरोपानुसार, संबंधित गावात पूर्वी सुमारे ७०० घरे होती. मात्र आता बुडीत क्षेत्रातील घरांची संख्या तब्बल १,७०० पर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सुमारे १,००० घरे बोगस असल्याचा दाट संशय असून, या वाढलेल्या आकड्यामागे दलाल आणि संबंधित अधिकाऱ्यांचे संगनमत आहे का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
४०-६०च्या बॉण्डवर शेतकऱ्यांची फसवणूक?
जमीनमालकांकडून ४०-६०च्या बॉण्डवर सह्या घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोपही सौंदळकर यांनी केला आहे. याशिवाय फळबागायतीच्या मोजणी प्रक्रियेतही गैरव्यवहार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. झाडांच्या फांद्या रोवणे तसेच नवीन रोपे लावून त्याआधारे लाखो रुपयांचा लाभ लाटण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
एकाच व्यक्तीच्या नावावर १५ ते २० घरांचा आरोप
बुडीत क्षेत्रात एका व्यक्तीने १०० एकरांपेक्षा अधिक जमीन खरेदी करून वेगवेगळ्या नावांनी १५ ते २० घरे उभारल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. दलाल आणि संबंधित अधिकारी यांच्या संगनमताशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा प्रकार होणे शक्य नसल्याचे सौंदळकर यांनी म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र विशेष तपास पथक अर्थात SIT मार्फत चौकशी करावी किंवा अधीक्षक अभियंता, कोकण विभाग यांच्या स्तरावर सखोल तपास करण्यात यावा, अशी मागणी मनसेने केली आहे. बोगस लाभार्थी तसेच या प्रक्रियेत सहभागी असल्याचा संशय असलेल्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी अविनाश सौंदळकर यांनी निवेदनातून केली आहे.


