( रत्नागिरी )
रत्नागिरी पाटबंधारे विभागातील लाचखोरीच्या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईत कार्यकारी अभियंता गणेश हरीदास सलगर आणि कनिष्ठ लिपिक शेखर चंद्रमणी पवार यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने शनिवारी दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
मिळालेल्या माहितीनुसार, कुवारबाव येथील पाटबंधारे विभागात तक्रारदाराची काही देयके प्रलंबित होती. कपात केलेली रक्कम परत मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तब्बल 3 लाख 40 हजार रुपयांची लाच मागितली होती. या मागणीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने थेट एसीबीकडे तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच एसीबीच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला. लाचेच्या रकमेवर तडजोड होऊन 2 लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार कुवारबाव येथील कार्यालयात लाच स्वीकारताना दोन्ही आरोपींना एसीबीने रंगेहाथ पकडले.
या कारवाईनंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून दोघांनाही अटक करण्यात आली. शनिवारी न्यायालयात हजर केल्यानंतर पुढील तपासासाठी त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या धाडसी कारवाईमुळे जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, एसीबीच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

