(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा नजीकच्या भडकंबा गावातील चंद्रकांत दुधाणे आणि त्यांच्या एकत्र कुटुंबीयांनी यंदाच्या गणपती उत्सवासाठी साकारलेला वारकरी दिंडीचा देखावा परिसराचे लक्ष वेधून घेत आहे. चलचित्रांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या भक्तिमय देखाव्यात वारकरी दिंडीसह विविध प्रसंग सादर करण्यात आले आहेत.
दुधाणे कुटुंबीयांकडून दरवर्षी गणपती उत्सवानिमित्त वेगवेगळे देखावे आणि सीन साकारले जातात. यंदाच्या सजावटीमध्ये वारकरी दिंडीचा देखावा तयार करण्यात आला असून त्यामध्ये एसटी महामंडळाची बस, ज्ञानेश्वर माऊलींची दिंडी, वारकऱ्यांची फुगडी यांसह विविध प्रसंग दाखवण्यात आले आहेत. चलचित्रांमुळे देखाव्याला अधिक आकर्षक स्वरूप प्राप्त झाले असून तो पाहण्यासाठी परिसरातील नागरिक आणि गणेशभक्त उत्सुकतेने भेट देत आहेत.
याबाबत केतन दुधाणे यांनी सांगितले की, आम्ही सर्वजण एकत्र कुटुंब पद्धतीने दरवर्षी गणपती उत्सवात वेगवेगळे देखावे सादर करतो. गणपतीसाठी सजावट करताना दरवर्षी नवीन संकल्पना राबविण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षी भक्तिमय रूपातील वारकरी दिंडीचा देखावा साकारण्यात आला असून तो गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.


