(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबईतुन मोठ्या पगाराची नोकरी सोडून फुणगुस या आपली गावी शिवसेनेची शाखा सुरू करून त्याकाळी अनेक आव्हाने घेऊन संघर्ष करणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक सुहास उर्फ (बावा)परशुराम देसाई यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून एक कडवट शिवसैनिक हरपल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
मुंबईत ज्यावेळी शिवसेना विस्तारु लागली आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकांना कोकणात जाण्याचे आदेश दिले, त्यावेळी चांगल्या पगाराची नोकरी सोडून सुहास उर्फ बावा देसाई थेट आपल्या फुणगुस या गावी आले आणि शिवसेनेचे रोपटे लावले. शिवसेनेची पहिली शाखा फुणगुस गावात त्यांनी सुरू केली. साहजिकच येथील शिवसेनेचा ते पहिले शाखाप्रमुख बनले.
बेधडक, बेडर, धाडसी आणि अत्यंत आक्रमक असा हा त्यावेळचा शिवसैनिक, त्यावेळी त्यांना प्रचंड संघर्षाला तोंड द्यावे लागले. छातीची दोन बटणे उघडी आणि कपाळी भलामोठा नाम लावून शिवसेनेचा शाखाप्रमुख म्हणून मिरवणारा बावा त्यावेळी सर्वांच्या डोळ्यात खुपला होता. करडी नजर आणि अर्कट स्वभावामुळे तो फुणगुस गावात गुंड म्हणून हिणवला गेला. पण त्यांनी चिकाटी सोडली नाही. जितका आक्रमक होता तितकाच हळवा आणि माणुसकी व मैत्री जपणारा होता.
प्रत्येकाला स्वतः बावा म्हणून हाक मारणारा हा बावा पुढे सर्वांचा बावा झाला. त्यांनी लावलेले शिवसेनेचे रोपटे फळाला आले. गावात शिवसेनेचा वटवृक्ष झाला. फुणगुस गावातच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरात शिवसेना फोफावली. शिवसेना नेते माजी मंत्री सुभाष देसाई तसेच अन्य नेत्यांचे मार्गदर्शन मिळाले आणि बावा देसाईने शिवसेनेला उभारी दिली. पुढे अनेक आव्हानाला तो सहज सामोरे गेला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हेच एकमेव माझे दैवत असे ठामपणे सांगणारा “बावा” आर्थिक परिस्थितीमुळे मात्र हरला. परंतु त्यांनी जिद्द सोडली नाही. फुणगुस विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरमन म्हणून देखील त्याने आपली कारकीर्द गाजवली.
तत्कालीन पालकमंत्री रविंद्र माने, तसेच सुभाष बने, राजेंद्र महाडिक यांनी बावा ला अनमोल साथ दिली. परंतु बावा थकला होता. त्यांनी संपूर्ण आयुष्य शिवसेनेसाठी घालवले. परंतु आर्थिक परिस्थिती व शरीर देखील साथ देत नव्हते. अखेर कुटुंबासह पुन्हा मुंबई गाठली आणि सोमवारी दुपारी अखेरचा श्वास मुंबईतच घेतला. गेले काही दिवस तो दुर्धर अशा आजाराने त्रस्त होता. उपचार सुरू होते. परंतु उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता.
ऐन शिमगोत्सवात बावा च्या निधनाची बातमी गावात मिळताच सर्व कार्यक्रम तात्काळ थांबवण्यात आले. उत्सवाचा मानकरी असलेला “बावा” असा अचानक आपल्यातून निघून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून एक कडवट शिवसैनिक हरपल्याची प्रतिक्रिया देखील व्यक्त होत आहे. त्यांचेवर मुंबईतच अंत्यसंस्कार करण्यात आले. सुहास उर्फ बावाच्या पश्चात पत्नी मुले,भाऊ असा मोठा परिवार आहे.