(सिंधुदुर्ग / मालवण)
मालवण तालुक्यातील देवली पुलानजीक मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
देवली येथून कुंभारमाठच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने ओंकार भावा निकम (वय १२) आणि राजू अर्जुन निकम (वय १०) या दोन्ही बालकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सचिन अंकुश निकम हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती लक्षात घेऊन त्यांना तातडीने पुढील वैद्यकीय उपचारासाठी गोवा बांबुळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. एका वाटसरू दुचाकी चालकाने अपघात घडल्याचे पाहिल्यावर मालवणचे माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर मंदार लुडबे, पियुष चव्हाण व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी सचिन निकम यांना तातडीने उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात हलवले.
सदर अपघात नेमका कशामुळे आणि कशा प्रकारे घडला, याचा तपास मालवण पोलिसांकडून सुरू आहे.


