(फुणगूस / एजाज पटेल)
“हागणदारीमुक्त” गाव म्हणून ओळख सांगणाऱ्या फुणगूस गावात मात्र मध्यवर्ती व वर्दळीच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. फुणगूस गावातील खाडीभाग हा सुमारे वीस ते पंचवीस गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी असून येथे बाजारपेठ, आठवडा बाजार, बँक, तलाठी कार्यालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये-जा सुरू असते.
संगमेश्वर तसेच रत्नागिरी येथून एसटी महामंडळाच्या नियमित फेऱ्या फुणगूस पर्यंत सुरू असल्याने आजूबाजूच्या गावांतील नागरिक एसटी पकडण्यासाठी फुणगूस येथे येतात. मात्र एवढ्या महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण व प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत गाव हागणदारी मुक्त घोषित करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात सार्वजनिक ठिकाणी मूलभूत सुविधा नसल्याचे चित्र दिसून येत आहे. आठवडा बाजाराच्या दिवशी तर परिस्थिती अधिक गंभीर बनते. लांबून आलेल्या नागरिकांना उघड्यावर जाण्याची वेळ येत असून यामुळे आरोग्य व स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत आहे.
शासनाने ‘हागणदारीमुक्त भारत’ योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालयांवर भर दिला असला तरी सार्वजनिक व वर्दळीच्या ठिकाणी शौचालये उभारणे तितकेच गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायत व संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन खाडीभागाचे माध्यवर्ती ठिकाण असलेल्या फुणगूस परिसरात तातडीने सार्वजनिक शौचालय उभारावे, अशी जोरदार मागणी होत आहे. जर यावर लवकरात लवकर योग्य पावले उचलली गेली नाहीत तर स्वच्छतेच्या दृष्टीने मिळवलेली हागणदारी मुक्ततेची ओळख केवळ कागदापुरतीच मर्यादित राहणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

