(राजापूर / तुषार पाचलकर)
पन्हाळा-कोल्हापूरहून अनुस्कुरा मार्गे देवरुखच्या दिशेने जाणाऱ्या MH 04/CU/0566 क्रमांकाच्या आयशर वाहनाचा आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अनुस्कुरा घाटात अपघात झाला. वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
या आयशरमधून एकूण २० प्रवासी प्रवास करत होते. कोल्हापूर येथे नमनाचा कार्यक्रम उरकून हे प्रवासी देवरुखच्या दिशेने जात असताना अनुस्कुरा घाटात वाहनाचा ब्रेक फेल झाला आणि आयशर पलटी झाला. त्यावेळी देवरुख येथील सुभाष वास्कर हे वाहन चालवत होते.
अपघातात प्रवाशांना गंभीर दुखापत झाली नसली तरी काही जखमींना उपचारासाठी राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. जास्त दुखापत नसल्याने उपचारानंतर सर्वांना सोडण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पलटी झालेल्या आयशरमुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. पांगरीचे सरपंच अमर जाधव यांच्या माध्यमातून आमदार किरण सामंत यांनी तात्काळ क्रेनची व्यवस्था करून दिली. क्रेनच्या साहाय्याने पलटी झालेले आयशर सरळ करण्यात आले आणि त्यानंतर घाटातील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या वेळी रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे बीट अंमलदार दत्तात्रय बाणे, पोलीस कॉन्स्टेबल स्वनिल घाटगे आणि पोलीस कॉन्स्टेबल संपत माने यांनी घटनास्थळी कार्यरत राहून आवश्यक कार्यवाही केली.


