(संगमेश्वर / प्रतिनिधी)
माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्याच्या संगमेश्वर तालुका शाखेची विशेष सर्वसाधारण सभा दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी ज्येष्ठ नागरिक संघ, देवरूख यांच्या सभागृहात उत्साहात पार पडली. या सभेला जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत संगमेश्वर तालुक्यातील विविध विकास योजनांमधील अनियमितता, प्रशासनातील भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, तसेच लोकप्रतिनिधींकडून विकास कामांकडे होणारे दुर्लक्ष यांसारख्या जनहिताच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अनेक ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सभेत वक्त्यांनी सांगितले की, तालुक्यातील अनेक विकास योजना कागदावरच राबवल्या जात आहेत. कामांचा दर्जा निकृष्ट असून, अधिकारी वर्ग या कामांची पाहणी करण्यास टाळाटाळ करीत आहे. निधी खर्ची घालून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. तक्रारदार आणि अर्जदारांना त्रास देण्याच्या, त्यांना वेठीस धरण्याच्या घटना वाढत असल्याबाबतही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी तालुक्यातील विकास योजनांची नियतकालिक पाहणी करावी, अनियमिततेबाबत जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच, या सर्व मुद्द्यांवर जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांना निवेदन देण्यासाठी माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघाचे शिष्टमंडळ गठित करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.
जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, माहितीचा अधिकार हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असून, तो प्रभावीपणे वापरला गेला तरच शासनातील पारदर्शकता वाढेल आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण येईल. प्रत्येक कार्यकर्त्याने निडरपणे आणि तडफेने जनतेच्या हक्कांसाठी लढा दिला पाहिजे. सभेत उपस्थित कार्यकर्त्यांनी आपल्या अनुभवांची मांडणी करत, माहितीचा अधिकार जनतेच्या हितासाठी अधिक प्रभावीपणे वापरण्याचा संकल्प व्यक्त केला. शेवटी सर्व कार्यकर्त्यांनी संगमेश्वर तालुक्यात भ्रष्टाचारविरोधी, पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन प्रस्थापित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.

