(संगमेश्वर / प्रतिनिधी)
मुंबई येथील श्री स्वामी समर्थ रक्तपेढी आणि ड्रग्ज इन्स्पेक्टर्स वेल्फेअर असोसिएशन (दिवा) यांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मिरा रोड येथे आयोजित विशेष कार्यक्रमात डेरवण येथील बी.के.एल. वालावलकर रुग्णालयाच्या समर्थ रक्तपेढीचा उत्कृष्ट कार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ (DCGI) डॉ. राजीव सिंग रघुवंशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालिका डॉ. सुवर्णा पाटील यांच्या वतीने डॉ. सुनील नाडकर्णी, बीटीओ डॉ. सुनीता झुंजारवाड आणि गिरीश गुरप यांनी हा सन्मान स्वीकारला.
२६ वर्षांपासून कोकणासाठी जीवनदायी सेवा
सन २००० पासून कार्यरत असलेली वालावलकर रुग्णालयाची समर्थ रक्तपेढी गेली २६ वर्षे संपूर्ण कोकणातील रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण सेवा बजावत आहे. रक्त आणि विविध रक्तघटकांची सातत्याने उपलब्धता करून देत अनेक रुग्णांना जीवनदान देण्याचे कार्य ही रक्तपेढी करत आहे.
ग्रामीण भागात असूनही रक्तपेढीत अत्याधुनिक सुविधा, आधुनिक उपकरणे, कडक गुणवत्ता नियंत्रण प्रणाली आणि प्रशिक्षित कर्मचारी कार्यरत आहेत. FDA मान्यताप्राप्त कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण दिले जाते. तसेच स्वेच्छा रक्तदानाला प्रोत्साहन देण्यासाठी नियमित जनजागृती आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते.
अत्याधुनिक सुविधा आणि काटेकोर कार्यपद्धती
सुमारे ३१५० चौ. फूट क्षेत्रात कार्यरत असलेली ही रक्तपेढी FDA च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करते. रक्तदाते विभाग, प्रक्रिया प्रयोगशाळा आणि घटक प्रयोगशाळा स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. सर्व SOPs तयार करून योग्य ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले आहेत.
स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणासाठी दिवसातून तीन वेळा १ टक्का सोडियम हायपोक्लोराईट द्रावणाद्वारे साफसफाई केली जाते. संकलित रक्त शीतसाखळी (Cold Chain) पद्धतीने सुरक्षित ठेवून त्यावर तातडीने प्रक्रिया केली जाते. दरवर्षी सुमारे ६ हजार रक्तघटकांची प्रक्रिया केली जाते, २५ हून अधिक रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात आणि ३ हजारांपेक्षा अधिक अॅनिमिया रुग्णांना मदत पुरवली जाते.
अनुभवी नेतृत्वामुळे रक्तपेढीची प्रगती
रक्त संक्रमण सेवेत ४१ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या वरिष्ठ बीटीओ डॉ. सुनीता माधव झुंजारवाड यांच्या नेतृत्वाखाली रक्तपेढीचे कार्य अधिक सक्षम झाले आहे. त्यांनी पीजीआय चंदीगड येथे डॉ. जे. जी. जॉली यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले असून, डॉ. झरीन भरुचा आणि American Red Cross (MSAC) यांच्याकडूनही विशेष प्रशिक्षण घेतले आहे. रक्तपेढी EQAS मध्ये नोंदणीकृत असून गुणवत्ता तपासणीत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहे.
आपत्कालीन काळात ठरली जीवनवाहिनी
सन २०१२ मधील लेप्टोस्पायरोसिस आणि डेंग्यू साथीच्या काळात प्लेटलेट्सची गरज असलेल्या रुग्णांसाठी ही रक्तपेढी मोठा आधार ठरली होती. प्रसूतीनंतर रक्तस्राव झालेल्या माता, अपघातग्रस्त रुग्ण आणि कर्करोग उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठीही रक्तपेढीने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
टाटा मेमोरियल सेंटरच्या आउटरीच केंद्र म्हणूनही ही रक्तपेढी कार्यरत असून, केमोथेरपीमुळे बोन मॅरोवर परिणाम झालेल्या कर्करोग रुग्णांना मोठी मदत केली जाते.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी विशेष मदत
आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) तसेच संस्थेमार्फत रक्त प्रायोजित केले जाते. “रक्त हे प्रत्येक गरजू रुग्णासाठी जीवनदायी उपचार आहे,” या तत्त्वावर रक्तपेढी कार्यरत असल्याची माहिती वैद्यकीय संचालिका डॉ. सुवर्णा पाटील यांनी दिली.
फोटो :
मुंबई येथील ड्रग्ज इन्स्पेक्टर्स वेल्फेअर असोसिएशन (दिवा) यांच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात डेरवण येथील बी.के.एल. वालावलकर रुग्णालयाच्या समर्थ रक्तपेढीचा विशेष सन्मान करण्यात आला. हा सन्मान स्वीकारताना डॉ. सुनील नाडकर्णी, बीटीओ डॉ. सुनीता झुंजारवाड आणि गिरीश गुरप.

