(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील आठवडा बाजार परिसरात एका हॉटेलसमोरील पायरीवर बेशुद्धावस्थेत आढळलेल्या अंदाजे ४० वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाला. पोलिसांच्या डायल ११२ पथकाने त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय तपासणीनंतर उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ही घटना ३० ऑक्टोबर रोजी सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आठवडा बाजार येथील रुद्र हॉटेलसमोरील चिंतामणी प्लाझा परिसरात सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास एक पुरुष बेशुद्धावस्थेत पायरीवर पडलेला असल्याचे निदर्शनास आले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या डायल ११२ पथकातील अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित व्यक्तीला तातडीने उपचारासाठी सकाळी ९.३९ वाजता सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. नूतन सानगरे यांनी तपासणी केली असता, संबंधित व्यक्तीचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एमएलसी पत्राद्वारे पोलिसांना कळविल्यानंतर आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, अंदाजे ४० वर्षे वय असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यू क्रमांक १४३/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याबाबत तसेच मृत्यूच्या कारणांचा तपास करण्याबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे.


