(चिपळूण/ रत्नागिरी)
शहरातील नगरपरिषदेसमोरील रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने विंगर बस उभी केल्याने वाहतूक कोंडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहन पुढे घेण्यास सांगितल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्याशी वाद घालत धमकीच्या स्वरूपात बोलणे, हातवारे करणे तसेच अश्लील शिवीगाळ करून सार्वजनिक ठिकाणी अपमान केल्याचा आरोप बसचालकावर करण्यात आला आहे. शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास चिपळूण नगरपरिषदेसमोरील रस्त्यावर हा प्रकार घडला. आरोपी अभिजित काशिनाथ महागावकर (४०, रा. पाचाड, ता. चिपळूण) याने त्याच्या ताब्यातील पिवळ्या रंगाची विंगर बस क्रमांक MH 03 ES 5462 रस्त्यावर अशा पद्धतीने उभी करून ठेवल्याचा आरोप आहे की, त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना तसेच पादचाऱ्यांना अडथळा आणि धोका निर्माण झाला. परिणामी त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यावेळी चिपळूण शहरात पेट्रोलिंग करत असलेले पोलिस कर्मचारी प्रितेश प्रकाश शिंदे (३८, रा. पोलिस वसाहत, चिपळूण) यांनी वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशाने महागावकर यांना वाहन पुढे घेण्यास सांगितले. मात्र, वाहन हटविण्यास सांगितल्याने आरोपीने धमकीच्या स्वरूपात बोलत हातवारे केले आणि अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
तसेच सार्वजनिक ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्याचा अपमान करून त्यांच्या शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९०/२०२६ नोंदविण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम २२१, २२४, ३५२, २८५ आणि ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


