(राजापूर / रत्नागिरी)
आडीवरे–रत्नागिरी मार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या मारुती स्विफ्ट कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याची घटना ५ मे रोजी सकाळी घडली. या अपघातात दुचाकीस्वार प्रकाश राजाराम साळवी (५५, रा. वाडापठ, आडीवरे, ता. राजापूर; मूळ रा. फणसवणे कुंभारवाडी, ता. संगमेश्वर) हे गंभीर जखमी झाले असून, दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश साळवी हे त्यांच्या ताब्यातील MH 08 AC 6604 क्रमांकाच्या दुचाकीवरून आडीवरे ते रत्नागिरीच्या दिशेने जात होते. सकाळी सुमारे ९.५५ वाजण्याच्या सुमारास नवेदर ते कोंडसर ब. स्टॉपदरम्यान स्मशानभूमीजवळ ही घटना घडली. यावेळी आरोपी यासीर निसार हबीब (३०, रा. नाटे, ता. राजापूर) हा MH-08-R 5288 क्रमांकाची मारुती स्विफ्ट कार चालवत होता. स्विफ्ट चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून पुढे जाणाऱ्या साळवी यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत साळवी यांच्या उजव्या व डाव्या पायाला तसेच उजव्या हाताला गंभीर व साधी दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अपघातामुळे दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले. या प्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९९/२०२६ नोंदविण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब), ३२४ (५) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, भरधाव व निष्काळजी वाहनचालना पुन्हा एकदा अपघाताचे कारण ठरत असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. मार्गावरील वाहतूक, वळणे आणि स्थानिक परिस्थितीचा विचार न करता वाहन चालविल्यास काही क्षणांचा निष्काळजीपणा गंभीर दुखापतींना कारणीभूत ठरू शकतो. या प्रकरणातील पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.


