(चिपळूण)
कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेद्वारे संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या प्रथम वर्ष कृषीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न झाली. या शैक्षणिक सहलीद्वारे विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान आणि संशोधनाची प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर जाऊन माहिती घेतली.
या शैक्षणिक सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली तसेच त्यांतर्गत येणाऱ्या मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली येथे विद्यार्थ्यांनी पिकांवरील विविध प्रयोग आणि संशोधनांची माहिती घेतली. कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र (ATIC), दापोली येथे कृषी तंत्रज्ञानाचे शेतकऱ्यांपर्यंत प्रसारण कसे केले जाते आणि नवीन वाणांची निर्मिती कशी होते, याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी पाहिले. आंबा गुणवत्ता केंद्र,दापोली येथे कमी क्षेत्रात अधिक वृक्षांची लागवड करून ‘हाय-डेन्सिटी प्लँटिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करून आंब्याचे उत्पन्न कसे वाढवता येईल, याचे सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले.
विद्यापीठांतर्गत विकसित करण्यात आलेले नवीन वाण, आधुनिक शेतीची अवजारे आणि बदलत्या हवामानानुसार शेतीमध्ये करावे लागणारे बदल यावर विद्यार्थ्यांनी तज्ज्ञांशी चर्चा केली. कृषी पदवीचे शिक्षण घेताना या प्रक्षेत्र भेटींमुळे पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
ही सहल यशस्वी करण्यासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शमिका चोरगे आणि उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयातील प्रा. विघ्नेश सकपाळ व प्रा. प्रशांत इंगवले यांच्या नियोजनामुळे ही सहल शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.

