( चिपळूण )
शहरातील मुरादपूर रेल्वे स्टेशन रोडवर रविवारी सकाळी भरधाव आयशर ट्रकने महावितरणच्या दोन वीज खांबांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले असून अपघातानंतर चालक ट्रकसह घटनास्थळावरून फरार झाला आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २६) सकाळी सुमारे ७:३० वाजता मुरादपूर येथील गणपती मंदिराजवळ, हरिविश्व अपार्टमेंटसमोर हा अपघात झाला. आरोपी चालक किरण कृष्णा गडकरी (वय ४०, रा. पुणे) हा आयशर प्रो एक्स (क्र. MH 12 ZE 4223) ट्रक चालवत होता. त्याने वाहन बेदरकारपणे चालवून रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरणच्या मेन लाईन पोल आणि एलटी पोलला धडक दिली.
धडकेची तीव्रता इतकी होती की दोन्ही वीज खांबांचे मोठे नुकसान झाले आणि ते कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला. अपघातानंतर चालकाने कोणतीही माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेत महावितरण कंपनीचे अंदाजे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले असून ट्रकचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी महावितरणचे सहाय्यक अभियंता सचिन बाळकृष्ण कोळेकर (वय ३९) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, ३२४(३), सार्वजनिक संपत्तीस नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ चे कलम ३ तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

