(चिपळूण)
दीपावलीचा जल्लोष ओसरला असला तरी परतीच्या पावसाने तालुक्यात हजेरी कायम ठेवली आहे. बुधवारी रात्रभर कोसळलेल्या पावसाच्या सरींनी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे. या सततच्या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून, आतापर्यंत तालुक्यात सुमारे ३४.६० हेक्टर क्षेत्रावरील भातपिकांचे पंचनामे तालुका कृषी विभागाकडून करण्यात आले आहेत. उर्वरित नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
तालुक्यातील दहा हजार हेक्टर क्षेत्र भात लागवडीयोग्य असले, तरी विविध कारणांमुळे भातशेतीचे प्रमाण घटले आहे. यंदा सुमारे ७,२०० हेक्टरवर भात, तर ५६८ हेक्टरवर नाचणीची लागवड करण्यात आली आहे. यंदाची खरीप हंगाम सुरुवातीपासूनच अडचणींनी भरलेला ठरला. सुरुवातीला लावणी रखडली, त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. त्या काळात कृषी विभागाने २२.४७ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे केले होते. ऑक्टोबरमध्ये नुकसानाचे प्रमाण तुलनेने कमी राहिले असून, सुमारे १० हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
पंचनामे गतीने सुरू
गेल्या तीन दिवसांतील सततच्या परतीच्या पावसाने नव्याने संकट ओढवले आहे. या पावसामुळे २२९ शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या शेतांची पाहणी करून पंचनाम्यांचे काम वेगाने सुरू असल्याचे तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे यांनी सांगितले. त्यांनी स्वतः कृषी सहाय्यक आणि मंडळ अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष शेतपातळीवर जाऊन नुकसानग्रस्त क्षेत्रांचा आढावा घेतला.
भातकापणीत अडचणी
सध्या तालुक्यातील ५० ते ६० टक्के भातकापणी पूर्ण झाली आहे. मात्र उर्वरित शेतांमध्ये पिके अजून उभी आहेत. शेतकरी भातकापणीसाठी सज्ज असले तरी, सकाळपासूनच पडणाऱ्या हलक्या सरींमुळे कामात अडथळे निर्माण होत आहेत. ओलसर हवामानामुळे पिक वाळवणे आणि कापणी दोन्ही प्रक्रियांना अडथळा येत आहे.

