(लातूर / वृत्तसंस्था)
लातूर शहरातील पद्मानगर भागातील राहत्या घरी शिक्षण संस्थाचालक संजीव चंद्रभानू सोनवणे (वय ६७) यांनी स्वतःच्या रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. मंगळवारी (१५ सप्टेंबर) सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत नोंद झाली असून, सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, सोनवणे यांनी सोमवार ते मंगळवार पहाटेदरम्यान हे टोकाचे पाऊल उचलले. घटनेनंतर उपाधीक्षक समीरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांच्यासह पथकाने घटनास्थळी पाहणी केली. ठसे तज्ज्ञ पथक आणि फॉरेन्सिक व्हॅनलाही पाचारण करण्यात आले.
सोनवणे घरी एकटेच होते. रात्रीचे जेवण दिल्यानंतर त्यांच्या सांगण्यावरून शेजारील व्यक्तीने घराला बाहेरून कुलूप लावले होते. सकाळी मुंबईवरून त्यांची बहीण घरी आल्यानंतर कुलूप उघडले असता सोनवणे यांचा मृतदेह आढळला.
घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली असून, “मी माझ्या स्वतःच्या जबाबदारीने गोळी झाडून घेत आहे. यासाठी कुणालाही दोषी ठरवू नये. याची चौकशीही करू नये,” असा मजकूर त्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रथमदर्शनी त्यांनी स्वतः डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे डीवायएसपी समीरसिंह साळवे यांनी सांगितले.
सोनवणे यांचा मुलगा अमेरिकेतील कॅलिफोर्नियात राहत असल्याने कुटुंबीय परतल्यानंतर अंत्यविधी केला जाणार आहे. १७ सप्टेंबरपर्यंत पार्थिव शवागृहात ठेवण्यात येणार आहे.
संजीव सोनवणे यांनी श्री चंद्रभानू सोनवणे महाविद्यालयाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात योगदान दिले होते. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश पूर्वपरीक्षांसाठी विशेष वर्ग तसेच उत्कृष्ट निकालामुळे त्यांच्या महाविद्यालयाने लौकिक मिळविला होता. त्यांच्या निधनाने निकटवर्तीयांसह शिक्षण क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.


