(पुणे)
सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दसऱ्याच्या दिवशी देवीला तब्बल १६ किलो वजनाची सोन्याची साडी परिधान करण्यात आली. दक्षिण भारतातील कुशल कारागिरांनी ही साडी सुमारे १६ वर्षांपूर्वी साकारली होती. त्यानंतर दरवर्षी मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून ही परंपरा सुरू आहे. श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टतर्फे वर्षातून दोनदा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवीला ही साडी नेसवली जाते. या सुवर्णवस्त्राच्या दर्शनासाठी आज दिवसभर भाविकांची मोठी गर्दी उसळली. आकर्षक नक्षीकाम केलेल्या या साडीत देवीचे रुप पाहण्यासाठी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
प्रतिकात्मक रावणदहन
दसरा सणानिमित्त मंदिर प्रांगणात तब्बल २५ फूट उंच प्रतिकात्मक रावणाचे दहन करण्यात येणार आहे. या रावणदहनातून स्त्री सबलीकरणाचा संदेश समाजाला दिला जाणार आहे.
विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी यांनी माहिती देताना सांगितले की, “पुरातन काळापासून दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटण्याची परंपरा आहे. त्याचाच संदर्भ घेत देवीला सोन्याची साडी नेसवली जाते. ही साडी हैदराबाद येथील कारागिरांनी सुमारे सहा महिन्यांच्या परिश्रमानं तयार केली आहे. एका भक्तानं देवीला अर्पण केलेली ही सोन्याची साडी आज मंदिराची परंपरा बनली आहे.”
दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्याला पुण्यातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, महालक्ष्मी देवीचं हे सुवर्णरुप दर्शन घेण्यासाठी भक्तांचा ओघ सुरूच आहे.

