(ठाणे)
कल्याण पश्चिम येथील खडकपाडा परिसरात २९ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचा मोबाईल हॅक करत अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात जिमचा मालक विनीत गायकर (३४), रा. गायकर हाऊस, कल्याण पश्चिम याला खडकपाडा पोलिसांनी तब्बल दीड महिन्याच्या शोध मोहिमेनंतर अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल चव्हाण यांनी दिली.
प्रेमसंबंध, हॅकिंग आणि ब्लॅकमेलचे जाळे
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी जिममध्ये व्यायामासाठी जात असे. त्या दरम्यान तिची जिम मालक विनीत याच्याशी चांगली ओळख झाली. ओळख मैत्रीत, मैत्री प्रेमात बदलली आणि आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवले. यानंतर आरोपीने पीडितेचा मोबाईल हॅक करून तिचे आणि त्याचे अश्लील व्हिडिओ चित्रीत केले. हे व्हिडिओ मोबाईलमध्ये दिसताच तरुणीने त्याला विरोध केला. त्यानंतर आरोपीने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
पीडितेने १४ ऑक्टोबर रोजी खडकपाडा पोलीस ठाण्यात बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि सायबर गुन्ह्याची तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि सापळा लावून अखेर फडके मैदान परिसरातून त्याला अटक केली.
तक्रार दाखल होऊ नये म्हणून आरोपीने काही दिवसांपूर्वी राजकीय बळाचा वापर करून पीडितेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याची माहितीही पोलिसांनी दिली. मात्र, पोलिसांनी कोणताही दबाव न मानता गुन्हा दाखल करून तपास सुरू ठेवला.
पोलिस आता आरोपीने अशाच पद्धतीने इतर कोणत्या मुलींना फसवलं आहे का, ब्लॅकमेल केलं आहे का, याचा सखोल तपास करत आहेत. आरोपीचा मोबाईल, उपकरणे आणि डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू असून तपास अधिकाऱ्यांच्या मते आणखी काही गंभीर तथ्ये समोर येण्याची शक्यता आहे. तपास सुरू असून पुढील चौकशीत या प्रकरणातील अनेक धागेदोरे उकलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

