(पुणे)
राज्यात शालार्थ आयडी घोटाळ्याची सर्वत्र चर्चा सुरू असताना पुण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शालार्थ आयडी तयार करून देण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. राज्य सरकारने या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र SIT स्थापन केली असतानाही शालार्थ आयडीसाठी पैसे उकळले जात असल्याने शिक्षण विभाग आणखीच बदनाम होत आहे.
तक्रारदारांची पत्नी सोलापूर जिल्ह्यातील एका माध्यमिक शाळेत 2016 पासून सहशिक्षिका म्हणून कार्यरत असून त्यांचा शालार्थ आयडी न मिळाल्यामुळे त्यांना वेतन मिळत नव्हते. शालार्थ आयडी मंजूर करण्यासाठी त्यांनी 16 जून 2025 रोजी संबंधित प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे येथे ई-ऑफिसद्वारे पाठवला होता. याच प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे यांनी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली, अशी तक्रार ACB कडे करण्यात आली.
पडताळणी आणि सापळा
१७ ते २१ नोव्हेंबर दरम्यान लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. २१ नोव्हेंबर रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात झालेल्या पडताळणीत आरोपी मिरगणे यांनी तक्रारदाराच्या पत्नीचा शालार्थ आयडी मंजूर करून देण्यासाठी एक लाख रुपये घेण्याची तयारी असल्याचे स्पष्ट झाले. २५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील स्वतःच्या केबिनमध्ये तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना ACB ने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. अटकेनंतर मिरगणे यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलिस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजीत पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केली.

