(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
शहरातील कोकणनगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव आता केवळ त्रासापुरता राहिलेला नसून नागरिकांच्या जीवित सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनला आहे. गेल्या अवघ्या आठवडाभरात मोकाट कुत्र्यांनी दोन लहान मुलांसह एका तरुणावर हल्ला करून त्यांना गंभीर दुखापत केल्याच्या घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांचा अचानक पाठलाग, झुंडीने भुंकणे आणि हल्ल्याच्या घटनांमुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडायचे तरी कसे, असा संतप्त सवाल रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्याची जबाबदारी असलेल्या रत्नागिरी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मात्र या समस्येकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. काही महिन्यांपूर्वी पालिकेने मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी नसबंदी मोहीम राबविल्याचा दावा केला होता. मात्र, त्या मोहिमेनंतर कोकणनगर परिसरातील परिस्थितीत नेमका काय फरक पडला, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच असेल, तर नसबंदी मोहिमेचे नियोजन, प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि त्याच्या परिणामांचे मूल्यमापन झाले तरी आहे का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. कोकणनगर आणि आसपासच्या भागात मोकाट कुत्र्यांच्या झुंडी रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. विशेषतः लहान मुले, शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना या कुत्र्यांचा धोका अधिक जाणवत आहे. अचानक पाठलाग करणाऱ्या किंवा अंगावर धावून येणाऱ्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात दोन लहान मुले आणि एका तरुणावर हल्ला झाल्याने परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे.
एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यानंतरच पालिका जागी होणार का? एखाद्या गंभीर दुर्घटनेची वाट पाहून उपाययोजना करण्याऐवजी आधीच प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची जबाबदारी प्रशासनाची नाही का, असा थेट प्रश्न रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे. मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी नसबंदी हा उपाय असल्याचे पालिकेकडून सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात कोकणनगरातील रस्त्यांवर वाढलेल्या कुत्र्यांच्या संख्येकडे पाहता ‘नसबंदी मोहीम कागदावरच झाली का?’ असा सवाल आता नागरिक करत आहेत. मोहीम राबविली असल्यास किती कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली? त्यातील किती कुत्र्यांची पुन्हा तपासणी झाली? परिसरातील कुत्र्यांची संख्या कमी झाली की नाही, याचे सर्वेक्षण करण्यात आले का? या प्रश्नांची उत्तरे पालिकेने नागरिकांसमोर ठेवणे आवश्यक आहे.
दरम्यान, परिसरातील काही चिकन सेंटरमधून उरलेले मांस आणि टाकाऊ भाग उघड्यावर टाकले जात असल्याने मोकाट कुत्र्यांच्या झुंडी त्या ठिकाणी जमा होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या अन्नासाठी कुत्र्यांमध्ये होणाऱ्या झटापटीमुळे ते अधिक आक्रमक होत असल्याचा प्राथमिक अंदाजही रहिवाशांनी व्यक्त केला आहे. हा दावा खरा असल्यास उघड्यावर मांसाचा कचरा टाकणाऱ्यांवर पालिका प्रशासनाची कारवाई का होत नाही? कचरा व्यवस्थापनाचे नियम केवळ कागदावर आहेत का? चिकन सेंटरची नियमित तपासणी होते का? नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कचऱ्याच्या विल्हेवाटीवर संबंधित विभागाचे नियंत्रण आहे की नाही, याचेही उत्तर प्रशासनाने द्यावे, अशी मागणी होत आहे.
प्रशासन आता तरी जागे होणार का?
मोकाट कुत्र्यांचा प्रश्न हा केवळ ‘स्वच्छता’ किंवा ‘प्राण्यांवरील नियंत्रण’ यापुरता मर्यादित नाही; तो थेट सार्वजनिक सुरक्षिततेशी जोडलेला प्रश्न आहे. त्यामुळे पालिकेने तातडीने कोकणनगर परिसरातील मोकाट कुत्र्यांची संख्या निश्चित करून प्रभावी उपाययोजना करणे, नसबंदी मोहिमेचा वस्तुनिष्ठ आढावा घेणे, हल्लेखोर कुत्र्यांबाबत आवश्यक ती कार्यवाही करणे आणि मांसाच्या कचऱ्याची उघड्यावर होणारी विल्हेवाट रोखणे गरजेचे आहे. दोन चिमुकल्यांसह तरुणावर हल्ला झाल्यानंतरही जर पालिकेच्या आरोग्य विभागाला जाग येत नसेल, तर आणखी किती नागरिक जखमी झाल्यावर प्रशासन हालचाल करणार? एखादी मोठी दुर्घटना घडण्याची प्रतीक्षा प्रशासन करत आहे का? नागरिकांच्या या प्रश्नांना आता केवळ आश्वासनांनी नव्हे, तर प्रत्यक्ष आणि परिणामकारक कृतीने उत्तर देण्याची वेळ आली आहे.


