(छत्रपती संभाजीनगर / वृत्तसंस्था)
जन्मदात्या आई-वडिलांनीच नवजात बाळाची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात उघडकीस आला आहे. बाळाच्या आईला एक आजार झाल्यानंतर डॉक्टरांनी बाळाला दूध पाजण्याचा पर्याय सुचवला. त्यामुळे बाळ परत घेण्यासाठी ती संबंधित महिलेकडे गेली असता, पैसेही परत न देण्यासह बाळ देण्यास नकार देण्यात आला. त्यातून झालेल्या वादानंतर हा प्रकार समोर आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत आई-वडिलांसह सात जणांना अटक करण्यात आली असून, बाळाला बालकल्याण समितीच्या आदेशानुसार ‘साकार’ सामाजिक संस्थेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, कांबळे दांपत्य हे गेल्या दोन-तीन वर्षांपासून एकत्र राहत होते. 5 जुलै रोजी घाटी रुग्णालयात वंदना हिने मुलाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर त्याची विक्री करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. वंदना हिने तिच्यासोबत काम करणाऱ्या कौशल्या नामक बाईकडे बाळ विकण्याबाबत सांगितले. त्यानंतर कौशल्या यांनी त्यांची मुलगी सीमा हिची वंदना यांच्याशी ओळख करून दिली.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बाळाच्या आई-वडिलांनी 1 लाख 20 हजार रुपये घेऊन ते सीमा हिच्याकडे दिले. त्यानंतर पैशांच्या व्यवहारातून बाळाची वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये विक्री होत गेली. अखेरीस या व्यवहाराची रक्कम 3 लाख 50 हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, बाळाच्या आई-वडिलांनी विक्रीतून मिळालेल्या पैशांतून मोबाईल आणि दागिने खरेदी केल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधित मोबाईल आणि दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.
27 सप्टेंबर रोजी सुरेश गुंटुका आणि उमा खटकम यांनी बाळाला पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी बाळाला बालकल्याण समितीसमोर हजर केले. समितीच्या आदेशानुसार बाळाची ‘साकार’ संस्थेकडे सुपूर्दगी करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असून, मुकुंदवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.


