(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील वारे समुद्रकिनारी खडकांमध्ये अडकलेल्या एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेहाच्या खिशात सापडलेल्या आधारकार्डावर केरळमधील पत्ता असून, वनप्लस मोबाईल आणि बँकेचे एटीएम कार्डही पोलिसांना मिळाले आहे.
३० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गावातील नागरिकांकडून वारे समुद्रकिनारी खडकांमध्ये एका पुरुषाचा मृतदेह अडकलेला असल्याची माहिती पोलीस पाटील अस्मिता अभय शिवलकर यांना मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता खडकांमध्ये मृतदेह अडकलेल्या अवस्थेत दिसून आला. यानंतर त्यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याला दूरध्वनीद्वारे माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस आणि होमगार्ड घटनास्थळी दाखल झाले. दोन पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून खडकांमध्ये अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृत व्यक्तीच्या अंगावरील ट्रॅक पँटच्या खिशात बंद अवस्थेतील वनप्लस कंपनीचा मोबाईल आढळला. तसेच आधारकार्ड आणि फेडरल बँकेचे एटीएम कार्डही मिळाले. आधारकार्डावर रॉजर आर. कॅशस्ट्रो असे नाव, ३१ मे १९९६ ही जन्मतारीख आणि केरळमधील तिरुअनंतपुरम येथील विझिंजम परिसरातील पत्ता नमूद आहे. एटीएम कार्डवरही रॉजर आर. कॅशस्ट्रो असे नाव असल्याने मृत व्यक्तीची ओळख पटविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला आहे.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १०१/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. समुद्रकिनारी मृतदेह आढळल्याने संबंधित व्यक्तीचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पोलिसांकडून पुढील तपास आणि ओळख पटविण्याची कार्यवाही सुरू आहे.


