( कोलकाता / वृत्तसंस्था )
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे मिर्झा गालिब स्ट्रीट परिसरातील एका हॉटेलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागून नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी कोलकात्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आज (बुधवारी) पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास हॉटेलमधील एका बंद खोलीत अचानक आग लागली. काही क्षणांतच धुराचे लोट संपूर्ण हॉटेलमध्ये पसरले. मध्यरात्री सर्वजण झोपेत असल्याने अनेकांना आगीची माहिती उशिरा मिळाली. धुरामुळे काही जण बेशुद्ध पडले आणि गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार ते पाच गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आपत्ती व्यवस्थापन पथकानेही बचावकार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी हॉटेलमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढत आग आटोक्यात आणली. या आगीत जवळील काही हॉटेल्सनाही धोका निर्माण झाला होता.
मृतांमध्ये उपचारासाठी कोलकात्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वैद्यकीय उपचारासाठी भारतात आलेल्या या नागरिकांवर या दुर्घटनेमुळे काळाने घाला घातला.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट किंवा एअर-कंडिशनरमधील बिघाडामुळे आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून या घटनेचा तपास सुरू आहे.

