(नाशिक)
स्वतःला अवतार म्हणून सादर करणाऱ्या अशोक खरात याचे काळे साम्राज्य अखेर कोसळले, आणि यामागे कोणतीही बाह्य यंत्रणा नव्हे तर त्याच्याच जवळच्या लोकांचे धाडस निर्णायक ठरले. खरातच्या बेडरूमपासून सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील फार्महाऊसपर्यंत चालणाऱ्या अश्लील कृत्यांचा आणि भक्तांची फसवणूक करण्याचा संपूर्ण पर्दाफाश तब्बल १६० जीबी डिजिटल पुराव्यांमधून झाला असून, हे सर्व पुरावे सर्वप्रथम शिर्डी पोलिसांकडे जमा झाले.
या प्रकरणाची सुरुवात मिरगाव येथील फार्महाऊसवरील एका कूकपासून झाली. खरात फार्महाऊसवर येण्यापूर्वी सीसीटीव्ही बंद करण्याचे आदेश देत असे. मात्र, संशयास्पद हालचालींमुळे कूकने त्याच्यावर लक्ष ठेवले आणि त्याने स्वतःच्या डोळ्यांनी खरातचे महिलांसोबतचे अश्लील वर्तन आणि नशेत केलेली कृत्ये पाहिली. भीतीच्या वातावरणातही कूकने ही माहिती खरातच्या एका विश्वासू ड्रायव्हरपर्यंत पोहोचवली, आणि याच ठिकाणी या प्रकरणाची ठिणगी पडली.
दरम्यान, खरातचा खरा चेहरा उघड करण्यासाठी त्याच्या कार्यालयातील एका ऑफिस बॉयने मोठी जोखीम पत्करली. त्याने गुप्तपणे कार्यालयात आणि वैयक्तिक केबिनमध्ये स्पाय कॅमेरे बसवले. उमाकांत तायडे यांच्या मदतीने मिळालेल्या या फुटेजमध्ये खरात महिलांसोबत अश्लील चाळे करताना आणि भक्तांची फसवणूक करताना स्पष्टपणे दिसून आला.
हे धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर खरातचे काही निकटवर्तीयही हादरले. ऑफिस बॉयला राजेंद्र जासूद, दिनेश परब आणि ललित पोफळे यांनी मानसिक आधार दिला. त्यानंतर अशोक भालेराव यांच्या माध्यमातून हे सर्व पुरावे शिर्डी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले.
एकेकाळी खरातला देव मानणाऱ्या भक्तांनीच त्याच्याविरोधात उभे राहत या प्रकरणाला निर्णायक वळण दिले. त्यांच्या धाडसामुळेच अखेर खरातला अटक होऊन त्याच्या पापांचा पर्दाफाश झाला. सध्या पोलिसांकडून या सर्व व्हिडिओंची तांत्रिक तपासणी सुरू असून, या तपासातून आणखी काही प्रभावशाली व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\
‘चमत्कार’ दाखवून जाळ्यात ओढले
2017 साली एका चार्टर्ड अकाउंटंटशी संपर्क साधताना खरातने सुरुवातीला अत्यंत विश्वासार्ह वर्तन केले. हळूहळू त्याने समोरच्या व्यक्तीचा विश्वास जिंकला. त्यानंतर ‘चमत्कार’ दाखवण्याच्या नावाखाली हवेतून काजू कतली काढल्याचा बनाव करत ‘प्रसाद’ म्हणून देऊन समोरच्या व्यक्तीला प्रभावित केले. अशा प्रकारच्या बनावट चमत्कारांद्वारे संबंधित व्यक्तींना आपल्या प्रभावाखाली आणून मोठ्या रकमेची उकळपट्टी केल्याचा आरोप आहे. अंधश्रद्धा आणि भीती यांचा वापर करून लोकांना जाळ्यात ओढण्याची पद्धत या प्रकरणातून समोर आली आहे.
या प्रकारामुळे समाजात मोठी खळबळ उडाली असून अंधश्रद्धेविरोधात पुन्हा एकदा जनजागृतीची गरज अधोरेखित झाली आहे. अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, नाशिक सत्र न्यायालयाने अशोक खरातला सहाव्या गुन्ह्यात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यानंतर विशेष तपास पथकाने (SIT) सातव्या गुन्ह्यासाठी त्याला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

