(सातारा / खंडाळा)
खंडाळा तालुक्यातील राजेवाडी गावच्या हद्दीत शिदेंवाडी-भोर महामार्गालगत शेताच्या बाजूला असलेल्या झुडपांमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तरुणीच्या डोळ्यांत मिरची पूड टाकल्याचे आढळून आल्याने तिची हत्या करण्यात आली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. मृत तरुणीचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, शिरवळ पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
शिदेंवाडी-भोर मार्गावरील राजेवाडी गावच्या हद्दीत शेतालगतच्या झुडपांमध्ये युवतीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सातारा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच शिरवळ रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली. झुडपांमधून मृतदेह बाहेर काढून पोलिसांनी पंचनामा केला.
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर तरुणीच्या डोळ्यांमध्ये मिरची पूड टाकल्याचे आढळून आले. त्यामुळे या मृत्यूमागे घातपाताची शक्यता अधिक बळावली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फलटण येथील फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक नमुने आणि पुरावे तपासण्याची प्रक्रिया केली.
मृत तरुणीचा मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. या घटनेची नोंद करण्याचे काम शिरवळ पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत सुरू होते.
दरम्यान, तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. तिचे वय २५ ते ३० वर्षांच्या दरम्यान असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. चेहऱ्यावर आणि डोळ्यांमध्ये मिरची पूड आढळल्याने तरुणीचा खून अन्यत्र करून तिचा मृतदेह राजेवाडी गावच्या हद्दीत आणून टाकला असावा, या शक्यतेनेही पोलिसांकडून तपास केला जात आहे.
तरुणीच्या मृत्यूमागे अनैतिक संबंधांचा संबंध असण्याची शक्यता तपास यंत्रणेकडून पडताळून पाहिली जात आहे. तसेच तरुणी गरोदर होती का, याबाबतही वैद्यकीय तपासणीच्या माध्यमातून माहिती घेतली जात आहे. या सर्व शक्यता तपासत शिरवळ पोलिसांनी तपासाला वेग दिला असून, तरुणीची ओळख आणि तिच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.


