( मुंबई )
शहरातील एका नामांकित शाळेतील शिक्षिकेविरोधात १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात आता महत्त्वपूर्ण वळण आले आहे. शिक्षिकेने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली असून, या याचिकेत तिने स्वतःवर लावण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. शिक्षिकेच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्याशी तिने कोणतीही जबरदस्ती केली नव्हती. उलट, विद्यार्थीच संबंध ठेवण्यासाठी आग्रह धरत होता आणि त्याला समजावण्याचे अनेक प्रयत्न आपल्याकडून करण्यात आले होते, असा दावा याचिकेत केला आहे. विद्यार्थ्याने पाठवलेले संदेश आणि ईमेल यांचे पुरावेही शिक्षिकेने न्यायालयात सादर केले आहेत.
पालकांना होती माहिती?
शिक्षिकेच्या याचिकेत, विद्यार्थ्याच्या पालकांनी मध्यंतरी त्याचा मोबाईल व लॅपटॉप काढून घेतल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना परिस्थितीची कल्पना असावी, अशी शक्यता शिक्षिकेच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे. शिक्षिकेला अटक करण्यात आल्यानंतर तिच्या वकिलांनी जामिनासाठी तयारी केली असून, येत्या आठवड्यात सुनावणीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
प्रकरण नेमकं काय आहे?
घटना दादर परिसरातील आहे. एका प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिकेने १६ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून, याप्रकरणी पोक्सो कायद्यानुसार कलम ४, ६ आणि १७, तसेच भारतीय दंड संहितेतील इतर कलमां अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, डिसेंबर २०२३ मध्ये शाळेच्या स्नेहसंमेलनात शिक्षिका आणि विद्यार्थी यांच्यात पहिल्यांदा संपर्क झाला. जानेवारी २०२४ मध्ये शिक्षिकेने स्वतःच्या वाहनात पहिल्यांदा शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दक्षिण मुंबई व विमानतळ परिसरातील काही मोठ्या हॉटेलमध्ये नेऊनही शिक्षिकेने शारीरिक संबंध केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
विद्यार्थ्याने या प्रकारानंतर हळूहळू शिक्षिकेपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिक्षिकेने इतर विद्यार्थ्यांमार्फत किंवा सहकारी शिक्षकांद्वारे विद्यार्थ्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यामुळे पीडित विद्यार्थी मानसिक तणावात गेला. पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, शिक्षिका विद्यार्थ्याला मद्यपानास प्रवृत्त करणे व तणाव कमी करण्याच्या औषधांचा वापर करणे असे प्रकारही करत होती, असा आरोप करण्यात आला आहे.
पालकांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले
विद्यार्थी अबोल होत चालल्याचे लक्षात आल्यानंतर पालकांनी मुलाशी संवाद साधला. त्यावेळी विद्यार्थ्याने सत्य सांगितले. मात्र, त्याचे दहावीचे वर्ष सुरू असल्यामुळे बदनामीच्या भीतीने पालकांनी प्रारंभी ही गोष्ट दडपण्याचा प्रयत्न केला. शिक्षिका शाळा संपल्यानंतर पाठलाग थांबवेल, अशी अपेक्षा त्यांनी बाळगली होती. मात्र, तिने संपर्क सुरूच ठेवल्यामुळे अखेर पालकांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.