(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहर परिसरात अमली पदार्थांची कथित बेकायदा विक्री रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाई केली. १२ आणि १३ सप्टेंबरच्या मध्यरात्री करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये हेरॉईनसदृश अमली पदार्थाच्या एकूण ८४ पुड्या जप्त करण्यात आल्या. या कारवायांमध्ये दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, मोबाईल फोनसह एकूण ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पहिली कारवाई १२ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ११ वाजता रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरात, छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या मागील बाजूस आंब्याच्या झाडाखाली करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, अलमहीब असगर सोलकर (३०, रा. कर्ला, रत्नागिरी) याच्या ताब्यात विक्रीच्या उद्देशाने हेरॉईनसदृश पदार्थ असल्याचा संशय असलेला मुद्देमाल आढळून आला. या कारवाईत प्लास्टिक पिशवीसह ४.५ ग्रॅम वजनाचा पदार्थ मिळून आला असून, त्यातील निव्वळ पदार्थाचे वजन २.५ ग्रॅम असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याच्या ५२ पुड्या तयार करण्यात आल्या होत्या. या पुड्यांची किंमत प्रत्येकी ५०० रुपये या प्रमाणे २६ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
याशिवाय पुड्या बांधण्यासाठी वापरलेले कागदाचे तुकडे आणि एक ओपो कंपनीचा मोबाइल असा मुद्देमालही जप्त करण्यात आला. या कारवाईतील एकूण मुद्देमालाची किंमत ४६ हजार रुपये असल्याचे नमूद आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार गणेश राजेंद्र सावंत यांनी फिर्याद दिली. त्यानुसार रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क) व २१(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पहिल्या कारवाईनंतर अवघ्या काही तासांतच पोलिसांनी दुसरी कारवाई केली. १३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.११ वाजण्याच्या सुमारास निवखोलकडे जाणाऱ्या मार्गावरील लाला कॉम्प्लेक्ससमोरील विद्युत खांबाजवळ ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, तनवीर युसूफ मुल्ला (५२, रा. राजीवडा, बडये मशीदजवळ, रत्नागिरी) याच्या ताब्यात विक्रीच्या उद्देशाने हेरॉईनसदृश अमली पदार्थ असल्याचा संशय असलेला मुद्देमाल आढळून आला. प्लास्टिक पिशवीसह ३.५ ग्रॅम वजनाचा पदार्थ मिळून आला असून, त्याच्या ३२ पुड्या तयार करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. प्रत्येकी ५०० रुपये या प्रमाणे या पदार्थाची किंमत १६ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे. या कारवाईत पुड्या बांधण्यासाठी वापरलेले कागद, एक जुनी पांढऱ्या रंगाची प्लास्टिक पिशवी तसेच १९ हजार रुपये किमतीचा ओपो कंपनीचा मोबाइल जप्त करण्यात आला. या कारवाईतील एकूण मुद्देमालाची किंमत ३५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार विनोद विश्राम कदम यांनी फिर्याद दिली असून, एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क) व २१(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी मध्यरात्री झालेल्या या कारवायांमुळे अमली पदार्थांच्या कथित बेकायदा व्यवहारावर पोलिसांचे लक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः तरुणांपर्यंत अमली पदार्थ पोहोचण्याची शक्यता लक्षात घेता, अशा विक्रीच्या साखळीचा उलगडा करून त्यामागील मुख्य सूत्रधारांपर्यंत तपास पोहोचविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.


