( पुणे )
जुन्नर तालुक्यातील जुन्नर-ओतूर मार्गावर पांगरीमाथा येथे झालेल्या भीषण अपघातात नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी (वय 52) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात आणखी दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
शनिवारी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. ओतूर कडे जाणारा हायवा ट्रक आणि विरुद्ध दिशेने येणारी कार यांची पांगरीमाथा येथील वळणावर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून उपचारासाठी ओतूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमी असलेल्या गवारी आणि विजय खारतोडे यांना पुढील उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच अनंता गवारी यांची प्राणज्योत मालवली. या अपघातात विजय खारतोडे (वय 48) आणि तुषार कोरडे (वय 35) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाणे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी ती सुरळीत केली. पुढील तपास सुरू आहे.
अनंता गवारी हे महसूल विभागात शांत, संयमी आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने महसूल विभागात मोठी पोकळी निर्माण झाली असून सहकाऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

