(नवी दिल्ली)
नवी दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे यांनी पक्षातील नाराजी आणि मतभेदांच्या चर्चांवर मोठे वक्तव्य केले आहे. “माझी पार्थ पवार किंवा कोणावरही नाराजी असण्याचे कारण नाही. पक्षाची पुढची वाटचाल मजबूत करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र काम करत आहोत,” असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
“पार्थ पवार आणि जय पवार राजकारणात सक्रिय”
तटकरे म्हणाले की, पार्थ पवार आणि जय पवार हे आता राजकारणात अधिक सक्रिय झाले आहेत. पक्षाची पुढील दिशा ठरवण्यासाठी त्यांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्ये सुरू असलेली अस्वस्थता लवकरच संपुष्टात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पुढील आठवड्यात मुंबईत पक्षाची महत्त्वाची बैठक होणार असून, त्यात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, निवडणूक आयोगाशी संबंधित पत्रव्यवहार आणि पक्ष संघटनात्मक मुद्द्यांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
“मी 42 वर्षांपासून राजकारणात”
आपल्या राजकीय प्रवासाबद्दल बोलताना तटकरे म्हणाले, “मी गेली ४२ वर्षे सक्रिय राजकारणात आहे. तालुका काँग्रेसच्या सरचिटणीस पदापासून जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, मंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशी विविध पदे भूषवली आहेत.” यावेळी त्यांनी वसंतदादा पाटील, शरद पवार, अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत काम केल्याचा उल्लेख केला.
शरद पवारांच्या भेटीवर स्पष्टीकरण
शरद पवार यांच्या भेटीबाबत बोलताना तटकरे म्हणाले की, “गेल्या तीन वर्षांत माझी त्यांच्यासोबत भेट झाली नव्हती. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी वेळ मागितला होता. त्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.” तसंच, शरद पवार यांनी केलेल्या कौतुकाबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं की, “१९८७-८८ पासून मी त्यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे त्यांनी मोठ्या मनाने कौतुक केले असेल.”
“एनडीएसोबत जाण्याच्या निर्णयात मी महत्त्वाचा घटक”
पक्षातील मतभेदांवर पडदा टाकताना तटकरे म्हणाले, “आमचे समज आणि गैरसमज दूर झाले आहेत. मी कधीही नाराज नव्हतो. आम्ही एनडीएसोबत जाण्याच्या निर्णयात मी स्वतः महत्त्वाचा घटक होतो.” लवकरच पक्षातील सर्व नेते महाराष्ट्र दौरा करणार असून पक्ष पुनर्बांधणीला सुरुवात केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विलीनीकरणाच्या चर्चांवरही प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांवर बोलताना तटकरे म्हणाले की, सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांनी स्पष्टपणे विलीनीकरण होणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्या विषयावर बोलण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

