(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरातील कर्ला मशिद परिसरातून ७० वर्षीय महिला घरातून अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. कुटुंबीयांना कोणतीही कल्पना न देता घरातून बाहेर पडलेल्या या वृद्ध महिलेचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपनयनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून महिलेचा शोध सुरू आहे.
सुलताना इस्माईल शेख (वय ७०, रा. घर क्रमांक ७८/अ, कर्ला मशिदीजवळ, रत्नागिरी) असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांची मुलगी निलोफर जहिर मकादम (वय ४१) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास सुलताना शेख या कर्ला मशिदीजवळील आपल्या राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडल्या. त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा नातेवाईक, परिचित तसेच संभाव्य ठिकाणी शोध घेतला; मात्र त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.
वृद्ध महिला बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमागे नेमके काय कारण आहे, त्या स्वतःहून घराबाहेर पडल्या की त्यांना कोणी घेऊन गेले, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. या प्रकरणी गु.र.नं. ३४५/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम १४०(३) प्रमाणे अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेपत्ता सुलताना शेख यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, त्यांच्या हालचालींची माहिती मिळविण्यासाठी विविध शक्यता तपासल्या जात आहेत.


